विविध अडचणींवर मात करीत गणेशोत्सवासाठी उत्साह

विविध अडचणींवर मात करीत गणेशोत्सवासाठी उत्साह

Published on

खड्ड्यातूनच बाप्पाचे आगमन
शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात महापालिका अपयशीः गणेशभक्तांमध्ये नाराजी
भिवंडी, ता. २६ (बातमीदार) : आभाळातून वरुणराजा पावसाचा वर्षाव करत असताना खड्ड्यातून वाट काढत गणेशभक्त आपल्या लाडक्या बाप्पाला मंडळात आणि घरी घेऊन जात आहेत. मात्र, पालिका प्रशासनाला शहरातील खड्डे दुरुस्त करण्यासाठी आजपर्यंत अपयश आल्याने बाप्पाचे खड्डयांतूनच आगमन झाले आहेत. या प्रकरणी गणेशभक्तामध्ये असंतोष पसरला असून संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यातील एका बाजूला सार्वजनिक मंडपात बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे घरगुती गणपती बसवणारे गणेशभक्त देखील उत्सवाच्या तयारीत व्यस्त आहेत.
बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात १३५ सार्वजनिक मंडळाव्यतिरिक्त दीड ते दहा दिवसांच्या सुमारे १० हजार मूर्तींची स्थापना केली जाते. शासकीय पातळीवर या वर्षी सार्वजनिक मंडळासाठी एक खिडकी योजना राबविण्यात आली नाही. तर, परवानगीसाठी ऑनलाईन अर्ज करून मागणी करण्यात आली आहे. बुधवारी घराघरात गणेशमूर्ती आणणार आहेत. तर काही सार्वजनिक मंडळाच्या मूर्त्यांना सांभाळून कार्यकर्त्यांनी मंडपापर्यंत आणल्या आहेत.

मूर्तीच्या पाटाचा रॉड तुटला
शनिवारी शहरातील खड्ड्यामधून सार्वजनिक गणेशमूर्ती रात्रीच्या वेळी भरपावसात घेऊन जात असताना अचानकपणे त्या मूर्तीच्या पाटाचा रॉड तुटला. तो ब्राह्मणआळीत दुरुस्त केला. या वेळी गणेशभक्तांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

बैठकी निष्फळ
गणेशोत्सवाच्या निमित्ताने गेल्या महिन्याभरापासून महानगरपालिका, गणेशोत्सव महामंडळ, पोलिस प्रशासन आणि वाहतूक पोलिस विभाग यांच्या अधिकाऱ्यांनी वारंवार बैठक घेऊन देखील पालिका प्रशासनाला शहरातील रस्त्यावरील खड्डे दुरुस्त करण्यास अपयश आले आहे. त्यामुळे गणेशभक्तामध्ये सर्व प्रशासनाच्या कामकाजाबाबत प्रचंड नाराजी असून सर्वत्र असंतोष पसरलेला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com