श्रीवर्धनमधील पहिला सिनेमा थिएटरमधला गणेशोत्सव
श्रीवर्धनमधील पहिला सिनेमा थिएटरमधला गणेशोत्सव
श्रीवर्धन, ता. ४ (वार्ताहर)ः श्रीवर्धन येथील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव येथील सिनेमा थिएटरमध्ये सुरू करण्यात आला होता. थिएटरचे मालक स्व. विनायक भाई मापुस्कर यांनी गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला होता. आज त्यांच्या पश्चात सोमजाई देवस्थाने ती परंपरा सुरू ठेवली आहे. मनोरंजनाबरोबरच धार्मिक उत्सवाला प्रोत्साहन देण्याचे काम मापुस्कर यांनी केले.
श्रीवर्धन तालुक्यातील रहिवाशांना एक मनोरंजनाचे साधन उपलब्ध व्हावे, या हेतूने श्रीवर्धन शहरातील वाणीआळी येथील उद्योजक विनायक भाई मापुस्कर यांनी १९५८ रोजी वाणीआळी परिसरात सिनेमा थिएटर सुरू केले. २१ आसन क्षमता असलेल्या थिएटरमध्ये ऐतिहासिक चित्रपटांबरोबर मनोरंजन करणारे मराठी व हिंदी चित्रपटांचे खेळ रात्री नऊ ते बारा या वेळेत दाखवण्यात येत असत. थिएटरच्या ऐसपैस जागेचा वापर हा धार्मिक कार्यक्रम अथवा उत्सवासाठी उपयोगात येऊ शकतो, हा विचार मापुस्कर त्यांच्या मनात आला व त्यांनी हा विचार मित्रमंडळींसमोर मांडला. श्रीवर्धन शहरात घरगुती गणपतीचे प्रमाण अधिक होते; परंतु सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना तालुक्यात कुठेच केली जात नव्हती. श्रीवर्धनमध्ये सार्वजनिक गणपती हवा या हेतूने मापुस्कर व त्यांच्या मित्रमंडळींनी शहरातील पहिली सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना १९६० रोजी श्रीवर्धन सिनेमा थिएटरमध्ये केली. श्रीवर्धनमध्ये पहिलाच सार्वजनिक गणपती असल्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत तो ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी सिनेमा थिएटरमध्ये फक्त रात्री नऊ ते बाराचा एकच खेळ दाखवला जात होता. त्यामुळे पडद्याच्या एका बाजूला गणपतीची आरास केली जात असे, तर सकाळच्या वेळेस पूजा सेवा व दुपारी, सायंकाळी आरत्या आणि भजनाचे कार्यक्रम पार पडत. त्यानंतर रात्री नऊ ते बाराचा सिनेमाचा खेळ सुरू होत असे. श्रीवर्धन येथील पहिल्या सार्वजनिक गणपतीची ख्याती तालुक्यात पसरल्यावर खेडेगावातील मंडळे भजनासह बैठक खेळ सादर करावयास येऊ लागले. अनेकदा सिनेमा थिएटरमध्ये होणारा एकमेव नऊ ते बाराचा खेळही रद्द करावा लागे. मापुस्कर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार थिएटरमध्ये उभ्या गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. गणपती मूर्तीच्या हातात गोकुळाष्टमीवेळी वापरण्यात येणारी चांदीची गदा ठेवण्यात येत होती.
==================================================================================================
सोमजाई देवस्थानने जोपासली परंपरा
कालांतराने श्रीवर्धन सिनेमा थिएटरमध्ये होत असलेली सार्वजनिक गणपतीची प्रतिष्ठापना श्री सोमजाई देवस्थान ट्रस्टच्या सौजन्याने सोमजाईदेवी मंदिरात होऊ लागली. आजही श्रीवर्धनमधील पहिला सार्वजनिक गणपती हा अनंत चतुर्दशीपर्यंत ठेवला जातो. भाविक व भक्त यांच्याकडून कुठल्याही प्रकारे वर्गणी अथवा देणगी न स्वीकारता सोमजाईदेवी मंदिरात गणेशोत्सव साजरा होतो. गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत दररोज गणेशमूर्तीची पूजा सेवा, सकाळ- सायंकाळ आरती तसेच स्थानिकांची भजने होतात. श्री सोमजाईदेवी मंदिरात प्रतिष्ठापना झालेल्या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.