उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन
उत्साहपूर्ण वातावरणात श्रीगणेशाचे विसर्जन
सकाळ वृत्तसेवा
पालघर, ता. २८ : जिल्ह्याच्या आठही तालुक्यांत उत्साहपूर्ण वातावरणात दीड दिवसाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. पालघर जिल्ह्यात गणेशोत्सवावर पावसाचे सावट असतानाही विसर्जनाच्या वेळी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह होता. जिल्ह्यात एकंदरच उत्साह व शांततेच्या वातावरणात दीड दिवसाच्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. या वेळी पोलिसांच्या आकडेवारीनुसार १६ पोलिस ठाण्यांच्या हद्दीमध्ये दीड दिवसाचे २३१ सार्वजनिक तर ४,४०५ गणपतींचे विसर्जन जिल्हाभरात पार पडले. दुपारी तीन वाजल्यापासून घरगुती बाप्पांच्या विसर्जनास सुरुवात झाली.
ढोल-ताशांचा सर्वत्र निनाद होता. अत्यंत प्रेमाने पुढल्या वर्षी लवकर या तसेच मोरयाचा गजर ऐकायला येत होता. विसर्जनासाठी गणपती चारचाकी वाहनातून येताना बच्चेकंपनी बेंबीच्या देठापासून पुढल्या वर्षी लवकर येण्याचे आर्जव करीत होती. पालघर शहरातील गणेश कुंड व नवली येथील तलावावर पालघर नगर परिषदेने विसर्जनासाठी अत्यंत चोख व्यवस्था ठेवली होती. तर डहाणू, पालघर, वसई तालुक्यातील किनारपट्टी भागात ग्रामपंचायतींमार्फत समुद्रकिनाऱ्यावर विसर्जन व्यवस्था ठेवण्यात आली होती. जिल्ह्याच्या मध्य पठारी व पूर्व डोंगराळ भागात तलाव, ओढे, नदी भागात विसर्जन पारंपरिक पद्धतीने पार पडले. काही ठिकाणी पारंपरिक वाद्यांच्या, तर काही ठिकाणी बँजोच्या तालावर विसर्जन मिरवणुका काढून गणरायाला निरोप देण्यात आला.
विसर्जनावेळी कोणताही अपघात घडू नये, त्यादृष्टीने नगर परिषदेने गणेश कुंडावर विसर्जनासाठी स्वयंसेवक नेमले होते. दुपारी तीन वाजता सुरू झालेले विसर्जन रात्री उशिरापर्यंत सुरू होते. पालघर नगर परिषदेतर्फे तलावात छोट्या होडीची व्यवस्था करण्यात आली होती. त्या होडीमध्ये बाप्पांना घेऊन त्यांचे विसर्जन करण्यात येत होते. या वेळी पालघर जिल्ह्यात पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. या वेळी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याकरिता पालघर पोलिसांकडून एक पोलिस अधीक्षक, एक अपर पोलिस अधीक्षक, चार उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधिकारी, पोलिस अंमलदार, होमगार्ड, स्ट्रायकिंग फोर्स, दंगल नियंत्रण पथक व राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी तैनात करण्यात आली होती.
गणेशमूर्ती दान उपक्रम
पालघर नगर परिषदेच्या गणेश मूर्तिदान उपक्रम स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त पालघर बनवण्याच्या दृष्टिकोनातून पालघर नगर परिषदेमार्फत यंदा प्रथमतःच राबवण्यात आला. या मूर्ती दिल्यानंतर त्या नगर परिषदेमार्फत विसर्जित करण्यात येणार आहेत. शहरातील वसंतराव नाईक चौक आणि पूर्व भागात नवली समाज मंदिर येथे मूर्ती संकलन केंद्रे व प्रत्येकी एक विसर्जन कृत्रिम तलाव स्थापन करण्यात आले होते. नगर परिषदेमार्फत गणेश कुंड विसर्जन घाटावर विशेष सुरक्षा ठेवली होती.
३२ कर्मचाऱ्यांची नेमणूक
नगर परिषदेकडून ३२ कर्मचाऱ्यांची नेमणूक यासह अग्निशमन दल, स्थानिक पोलिस, स्वयंसेवक, गृहरक्षक दल तैनात होते. चौकट पालघर शहरांमध्ये निर्माल्य टाकण्याची व्यवस्था नसल्यामुळे अनेक वेळा नागरिक घंटागाडीमध्ये निर्माल्य टाकतात. अशावेळी कचऱ्यात निर्मल्य जाते. म्हणून नगर परिषदेमार्फत निर्माल्य संकलनासाठी शहरभर दोन फिरती वाहने उपलब्ध करून देण्यात आली होती.
भाविकांचा सकारात्मक प्रतिसाद
शिस्तबद्ध मिरवणुका, पर्यावरणपूरक विसर्जन आणि प्रशासनाची चोख व्यवस्था यामुळे विसर्जन प्रसंग हा संयम, श्रद्धा आणि सामाजिक जबाबदारीचे उदाहरण ठरला. नगर परिषद आणि पोलिस प्रशासनाचे नियोजन भाविकांनी कौतुकास्पद ठरवले.
तालुकानिहाय विसर्जन (दीड दिवस)
पोलिस ठाणे सार्वजनिक मूर्ती खासगी मूर्ती
पालघर १५ ७००
मनोर ३३ ११२
सफाळा १७ ६१२
केळवा १६ ३२६
सातपाटी १० ४१५
बोईसर १५ ३९०
तारापूर १५ १२३
वाणगाव १४ १२६
डहाणू ५२ ४५४
तलासरी ८ ४०
घोलवड २३ १०४
जव्हार १ १८३
कासा ६ २५
विक्रमगड ४ ११८
वाडा २ ६५०
मोखाडा ० २७
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.