रोहा-नागोठणे मुख्य रस्ता पाण्याखाली
रोहा-नागोठणे मुख्य रस्ता पाण्याखाली
पावसामुळे शहरातील नाले तुंबले; वाहनचालक त्रस्त
रोहा, ता. ३० (वार्ताहर) ः गेल्या दोन दिवसांपासून रोहा शहर आणि परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. सलग पडणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून, अष्टमी गावाकडे जाणाऱ्या मुख्य नाल्यात कचरा अडकल्याने नाला तुंबला आहे. परिणामी, रोहा-नागोठणे हा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाली.
शुक्रवार आणि शनिवार या दोन दिवसांतील दमदार पावसाने नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. कुंडलिका नदीतील पाण्याची पातळीदेखील लक्षणीय वाढली. त्यातच अष्टमी नाक्यावरील जुना जकात नाका परिसरातील मुख्य नाल्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कचरा साचल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. त्यामुळे नाला तुंबल्याने रक्तपेढी व सफा मर्वाह इमारतीसमोरील गटारे ओव्हरफ्लो झाली. परिणामी, रोहा-नागोठणे मुख्य रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहू लागले. या पाण्यातून वाहनचालकांना मार्ग काढताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक वाहने पाण्यात बुडाल्याने बंद पडली, तर काही ठिकाणी वाहतूक ठप्प झाली.
नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे अशा प्रकारच्या समस्या वारंवार उद्भवत असून, नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. प्रत्येक पावसाळ्यात ही समस्या कायम असल्याने नागरिकांनी यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. विशेषतः नाल्यांची नियमित साफसफाई न झाल्यामुळे ही स्थिती निर्माण झाल्याचे स्थानिकांनी सांगितले.
.....................
प्रभावी उपाययोजनेची गरज
यासंदर्भात नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक मनोज पुळेकर यांनी माहिती देताना सांगितले, की नाला चोकअप झाल्याची माहिती मिळताच तातडीने कर्मचारी पाठवून नाल्याची सफाई करण्यात आली. त्यामुळे पाण्याचा निचरा झाला. दरम्यान, भविष्यात अशा घटना होऊ नयेत, यासाठी प्रभावी उपाययोजना करावी लागणार आहे. सध्या मुसळधार पावसाचा जोर कायम असल्यामुळे पुन्हा अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे प्रशासनाने तातडीने नियोजनबद्ध उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.