लाडक्या गौराईच्या आगमनाची उत्सुकता

लाडक्या गौराईच्या आगमनाची उत्सुकता

Published on

प्रसाद जोशी, वसई
लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर माहेरवाशीण असलेल्या गौराई मातेच्या आगमनाचे वेध गणेशभक्तांसह गौराई मातेच्या भक्तांना लागतात. सणासुदीत रूढी, परंपरा आणि संस्कृती अद्याप जपली जाते. पुढची पिढी त्याचे अनुकरण करून उत्सव मोठ्या आनंदात साजरा करते. सोमवारी (ता. १) गौरीची प्रतिष्ठापना केली जाणार असून, रविवारी गौरी आगमनाची मिरवणूक, पारंपरिक वेशभूषा करीत महिलांचा सहभाग असणार आहे. या वेळी पारंपरिक गाणी, नृत्यातून वातावरण आनंदीमय होणार आहे. त्यामुळे महिलांचा उत्साह शिगेला पोहोचला असून, स्वागताची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.

कोळीवाड्यातील गौरीपूजेला एक वेगळे महत्त्व, एक वेगळी अनुभूती असते. गौराईचा साजशृंगार पाहिल्यावर कोळी बहिणीची आठवण येईल. गौरीसोबत तेरड्याची पूजा केली जाते. या पूजेचे महत्त्व लोकगीतातून ऐकावयास मिळते. त्यामुळे लोकगीतांचाही स्पर्श होणार आहे. वसई पश्चिम दिवाणमान, नायगाव कोळीवाडा, नवापूर, कळंब, राजोडी, अर्नाळा, खोचिवडे, उमेळमान, नायगावसह पालघरनगरीतील कोळीवाडे सजणार आहेत.

माहेरवाशीण गौरी येणार म्हणून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ केले जाणार आहेत. अंगणी रांगोळीचा सडा तसेच फुलांची आरास व अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यात येत आहे. आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी समाजातील महिला पारंपरिक वेशभूषा करून गौरीला घरी घेऊन येतात. महिलांच्या डोक्यावर गौरी घेऊन मिरवणूक काढत घरी व सावर्जनिक मंडळात आगमन होणार आहे. त्यामुळे उद्या (ता. ३१) आनंद व भक्तिमय वातावरणात भाविक न्हाऊन निघणार आहेत. सोमवारी नववधू नटून-थटून, अंगणात रांगोळीचा सडा काढून त्यानंतर गौरीची ओटी भरणार आहे.

जशी विदर्भातील मुखवट्याची गौराई, कोकणातील खड्यांची गौराई प्रसिद्ध आहे तशीच अर्नाळा कोळीवाड्यात खुर्चीवर गौराई तसेच तेरड्याच्या पूजेला आगळे महत्त्व आहे. पूजा-अर्चा झाल्यावर विसर्जनापर्यंत पुरणपोळी, अळूच्या पानांचे पातवड, दूधभात, करंजी असा नैवेद्य ज्येष्ठ गौरीला दाखवला जाणार आहे. यासाठी महिलांनी तयारी केली असून, बाजारपेठदेखील पूजेच्या साहित्याने फुलली आहे. फुलांचे, फळांचे भाव वधारले असले तरी गौरीच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी उत्साह कमी झाला नसल्याचे दिसून येत आहे.

गौराईच्या गाण्यांनी रंगत
गौरीला आणण्यासाठी अर्नाळा येथील कोळी महिला या पारंपरिक वेशभूषा करीत वसई गाव गाठणार आहेत व तिथून गौरी घेऊन सुमारे १० किमी प्रवास पायी चालत करणार आहेत. यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, प्रवासादरम्यान गौरीची गाणी गेली जाणार आहेत.

पर्यावरण संर्वधनाचा प्रयत्न
ग्रामीण भागात आजही रूढी, परंपरा जपल्या जातात. शेतजमिनीच्या परिसरात तसेच जंगलात उगवणारी, दिंडीची कर्दळी, कंटोळी वेल, रंगीत फुले, कलई, शिराळा पाने, गवत आदींचा वापर करून गौरी सजवण्यात येते. मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते व विसर्जन हे शेतजमिनीत केले जाते. त्यामुळे पूर्वापार पर्यावरणाचा संदेश देणारी परंपरा जपली जात असल्याचे यंदादेखील उत्सवात दिसून येणार आहे.

वर्षातून एकदा माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या गौराईची आम्ही आतुरतेने वाट पाहात राहतो. माहेरच्या माणसांची ती दीड दिवसांत विचारपूस करून वर्षभर कृपादृष्टी ठेवते, अशी भावना आमची असते. माहेरवाशिणीला काही कमी पडू नये, यासाठी घराघरात धावपळ सुरू आहे. गौराई आम्हा कुटुंबाला एकत्र आणते.
- जान्हवी निनाद पाटील, अर्नाळा

वसई-विरार मिरा-भाईंदर परिसरातील गौराई
घरगुती १,८४५
सार्वजनिक ३४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com