धारावीकरांना घर देता का घर!
धारावीकरांना घर देता का घर!
गणेशोत्सव देखाव्यातून मांडली व्यथा
धारावी, ता. ३० (बातमीदार) : धारावीतील काळा किल्ला परिसरातील श्री हनुमान सेवा मंडळाने गणेशोत्सवात धारावीच्या आठवणींना उजाळा देत धारावी पुनर्विकासावर चलचित्रांच्या माध्यमातून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. याद्वारे धारावीतील एकूण स्थिती समोर ठेवत ‘धारावीकरांना घर देता का घर?’ अशी साद घातली आहे. मंडळाचा गणपती धारावीचा कालेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे. मंडळाचे ६३व्या वर्षात पदार्पण झाले आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ पर्यावणपूरक म्हणजे कागदाच्या लगद्यापासून साकारलेल्या गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पर्यावरणाचे महत्त्व अधोरेखित करीत आहे. यंदाच्या वर्षी ‘धारावी विकासाचा प्रश्न’ या चलचित्रातून मांडण्यात आला आहे. धारावीचा विकास सुरू होण्यास १९८५ साल उजाडावे लागले. त्या वेळी १८० चौ. फुटाचे घर इमारतीत देण्याची योजना आणली गेली. त्यानंतर धारावीचा कायापालट होईल अशी आशा निर्माण झाली होती. मात्र गाडे पुढे सरकले नाही. २००४ साली महाराष्ट्र शासनाने धारावी पुनर्वसन प्रकल्प जाहीर केला. अनेकदा सर्व्हे करण्यात आला, मात्र तब्बल २१ वर्षे उलटून गेल्यावरही विकासाचे घोंगडे भिजत पडले. त्याला वाचा फोडण्यासाठी मंडळाने चलचित्रातून वाट करून दिल्याचे मंडळाचे अध्यक्ष प्रशांत कदम सांगतात.
अरुंद गल्ल्या असल्याने एखादी दुर्घटना किंवा अपघात घडल्यावर आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. मुलांना अभ्यास करता येईल अशी शांतता असलेले घर मिळावे, गरिबांना रोजीरोटी देणारे लघुउद्योग टिकावे, अशी अपेक्षा चलचित्रात व्यक्त करण्यात आली आहे. सर्वांनाच एका विचाराने पुढे जाण्याची बुद्धी दे आणि पुढच्या पिढीला धारावीतच हक्काचे घर मिळू दे, असे साकडे मंडळाने धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर गणपतीला घातल्याचे मंडळाचे सचिव प्रमोद खाडे यांनी सांगितले.
धारावीचा विकास लवकरात लवकर व्हावा. स्थानिकांना ज्या समस्या भेडसावत आहेत त्या जगासमोर याव्यात, यासाठी यंदाच्या वर्षी ही चित्रफीत बनवली आहे.
- गणेश खाडे, चित्रफितीचे निर्माते व दिग्दर्शक
आम्ही वर्षभर सामाजिक बांधिलकीतून महिला, तरुण यांच्यासाठी विविध उपक्रम राबवत असतो. एमपीएससी, यूपीएससीची माहिती देणारी शिबिरे घेतली जातात. शासनाच्या विविध कार्यक्रमांत सहभाग घेतला जातो.
- नाना आगवणे, कार्याध्यक्ष
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.