जंजिरा किल्ल्याची पर्यटकांना प्रतीक्षा
जंजिरा किल्ल्याची पर्यटकांना प्रतीक्षा
डागडुजीनंतरच होणार खुला, पुरातत्त्व विभागाची माहिती; व्यावसायिकांचा तोटा
मुरूड, ता. ३१ (वार्ताहर) : कोकणातील ऐतिहासिक आणि जलदुर्गांमधील सर्वाधिक प्रसिद्ध असलेला जंजिरा किल्ला पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांसाठी बंद करण्यात येतो. दरम्यानच्या काळात किल्ल्यामध्ये झाडेझुडपे वाढतात. त्यामुळे डागडुजी केल्यानंतर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात किल्ला पर्यटकांसाठी खुला करण्यात येतो; मात्र यंदा खराब हवामान तसेच अद्यापही डागडुजीचे काम पूर्णत्वास आले नसल्याने यंदा किल्ल्याचे दरवाजे पर्यटकांसाठी उघडण्यास काहीसा उशीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पर्यटनाला मोठा फटका बसण्याची शक्यता असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सामान्यतः नारळी पौर्णिमेनंतर आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी खुला केला जातो; मात्र यंदा अतिवृष्टी आणि उधाणामुळे किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील काही भाग खचला आहे. तसेच २२ एकरांच्या विस्तीर्ण परिसरात झाडेझुडपे आणि बोरीच्या काट्यांचा प्रचंड साठा झाल्याने साफसफाईची गरज आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियमानुसार किल्ला उघडण्यापूर्वी डागडुजी व संपूर्ण परिसराची स्वच्छता करणे बंधनकारक असते. या कामासाठी मजुरांची उपलब्धता आणि निधीची आवश्यकता भासते. पुरातत्त्व विभागाने दिलेल्या माहितीनुसार, साफसफाईसाठी किमान १० ते १५ दिवस लागतात. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजपुरी प्रवासी वाहतूक सोसायटीकडून मजूर व साहित्य ने-आण करण्यासाठी होड्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे; परंतु सध्या मजुरांची टंचाई भासत असल्याचे सांगण्यात येत आहे. कोकणात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मजूर मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नसल्याने ही अडचण वाढली आहे. या विलंबामुळे पर्यटनपूरक व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवले आहे. मुरूड-जंजिरा परिसरातील हॉटेल, लॉजिंग, समुद्री खेळ, तसेच शिडाच्या बोटी व इंजिन होड्यांवर अवलंबून असलेल्या सुमारे १५० ते २०० कुटुंबांची आर्थिक कोंडी त्यामुळे होणार आहे. प्रवासी वाहतूक थांबल्याने लाखोंचे नुकसान होत आहे. याशिवाय जून-जुलैनंतर पाऊस कमी झाल्यावर मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची जंजिरा किल्ला पाहण्यासाठी गर्दी होते. यामध्ये देश-विदेशातून पर्यटक येत असतात; मात्र किल्ला बंद असल्याने हा हंगाम व्यर्थ जात असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
.....................
पर्यटकांमध्ये जंजिरा आणि पद्मदुर्ग किल्ल्यांबाबत विशेष आकर्षण आहे. त्यामुळे किल्ला लवकरात लवकर खुला करण्याची मागणी स्थानिकांसह पर्यटकांकडून होत आहे. पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संवर्धक बी. जी. येलीकर यांनी सांगितले, की साफसफाई आणि डागडुजीसाठी किमान १० ते १५ दिवस लागतील. २० सप्टेंबरपर्यंत हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. एकूणच जंजिरा किल्ला बंद राहिल्याने पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसत आहे. पुरातत्त्व विभागाने स्वच्छता मोहीम वेगाने राबवून सप्टेंबर हंगाम वाचवण्याची गरज आहे, अन्यथा स्थानिक अर्थचक्रावर मोठा परिणाम होईल, असे बोलले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.