हराळे सेवा संघाचे गणेशोत्‍सवाचे ८० वे वर्ष

हराळे सेवा संघाचे गणेशोत्‍सवाचे ८० वे वर्ष

Published on

हराळे सेवा संघाचे गणेशोत्‍सवाचे ८०वे वर्ष
वर्षभर विविध सामाजिक उपक्रम
संजय शिंदे ः सकाळ वृत्तसेवा
धारावी, ता. ३१ : धारावी मुख्य रस्त्यावरील सकीनाबाई चाळ नावाने प्रसिद्ध असलेल्या विभागात गेल्या ८० वर्षांपासून हराळे सेवा संघातर्फे गणेशोत्सव साजरा केला जात आहे. १९४५ साली धारावीतील काळा किल्ला परिसरात हराळे (चर्मकार) समाजाने एकत्र यावे, या उद्देशाने गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली होती. दोन वर्षे गणेशोत्सव साजरा केल्यांनतर १९४७ साली सकीनाबाई चाळ येथे गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात झाली. विभागातील हनुमान मंदिराच्या आवारात गणेशमूर्तीची स्थापना करण्यात आली.
पूर्वी देखाव्यात सद्य:स्थितीवरील भाष्य करणारे चलतचित्र उभारले जायचे. सुप्रसिद्ध अभिनेत्री व निर्माता-दिग्दर्शक सुषमा शिरोमणी या ठिकाणी वास्तव्यास होत्या. त्यांनी हराळे संघाच्या गणेशोत्सवाची कॉपी आपल्या चित्रपटात वापरली होती; तर सुप्रसिद्ध नेपथ्यकार नंदलाल लोखंडे हे या गणपतीचे नेपथ्य करायचे. सुरुवातीला सहा फुटांची गणेशमूर्ती बसवली जायची. दरवर्षी मूर्तीची वाढ करीत यंदा १६ फुटांची गणेशमूर्ती विराजमान झाली आहे.
आजतागायत हजारो रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया संघातर्फे रुग्णालयांच्या सहकार्याने करण्यात आल्या आहेत. गणेशोत्सवाची वर्गणी जमा करण्यास कार्यकर्ते घरोघरी जातात तेव्हा विभागातील कुटुंबे त्यांचे आदरातिथ्य करून भरभरून वर्गणी देतात. वर्षभर गणेशोत्सवासाठी जमा केलेले पैसे महिला आनंदाने कार्यकर्त्यांकडे देतात. यातून समाजाचा सहभाग लाभतो. अनेक भाविक नवस बोलतात. नवस पूर्ण झालेल्या भाविकांनी मंडळाला चांदीचे साहित्य, मोठाले पितळी टाळ दिलेले आहेत. पूर्वीच्या काळी संघाचे स्वतःचे लेझीम पथक होते.

विविध उपक्रम
व्यसनमुक्तीसाठी संघाकडून सतत प्रयत्न केले जातात. ग्रंथालय चालवले जाते. त्यात शेकडो पुस्तके आहेत. यूपीएससी, एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लागणारी पुस्तके ठेवण्यात आली आहेत. पुस्तक दान या उपक्रमातून शेकडो पुस्तके संघाला लोकांनी दान म्हणून दिली आहेत.

राजकीय पक्षांचे बॅनर नाहीत
गणेशोत्सव कार्यक्रमात व संघाच्या कार्यात सर्वपक्षीय कार्यकर्ते व नेत्यांचा सक्रिय सहभाग असतो. यात पक्षीय राजकारण आणले जात नाही. त्‍यामुळे मंडपात कोणत्याही पक्षाचा बॅनर लावला जात नाही. तमिळनाडू राज्यातील धारावीत स्थायिक झालेली सोनार मंडळी दरवर्षी एक दिवस गणेशाची सेवा करतात.

सर्व जाती-धर्मांचे लोक गणेशोत्सवात उत्साहाने सहभागी होतात. तरुण पिढीला मागील पिढी सर्व मार्गदर्शन करीत असते. गणेशोत्सवाच्या वर्गणीतून जमा झालेल्या व उरलेल्या देणगीतून पुढील वर्षभर सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. तसेच स्थानिक रहिवाशांना सरकारी उपक्रमांची माहिती देणारे उपक्रम सतत राबवले जातात.
- शंकर बळी, अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com