पथदिव्यांचे खांब ठरतायत अडचणीचे
पथदिव्यांचे खांब ठरताहेत अडचणीचे
अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडीची शक्यता; नियोजनावर प्रश्नचिन्ह
श्रीवर्धन, ता. २ (वार्ताहर) : श्रीवर्धन शहरात सौरऊर्जेवर चालणाऱ्या आधुनिक आणि डेकोरेटिव्ह स्मार्ट स्ट्रीट लाइट पोल बसवण्याचे काम जोरात सुरू आहे. शहरी सौंदर्य वाढवणे आणि पर्यावरणपूरक रोषणाई उपलब्ध करून देणे हा या योजनेमागचा उद्देश असला तरी या कामामुळे अनेक ठिकाणी नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हे खांब उभे करण्यासाठी रस्त्याच्या रुंदीचा विचार न करता पाया घालण्यात आला आहे. आधीच अरुंद असलेल्या रस्त्यांवर आता हे खांब आल्याने वाहतूक कोंडी अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त होत आहे.
या प्रकल्पांतर्गत शहरात सहा मीटर उंचीचे सुमारे १५० डेकोरेटिव्ह खांब आणि १२. ५ मीटर उंचीचे १२ हायमास्ट बसवले जाणार आहेत. हे काम सध्या पावसाळ्यातच जलदगतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्त्यालगत असलेले पिचिंग फोडून त्यावर खांबाचे पाय उभारले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी रस्ता आणि पिचिंगच्या मधोमधच खांबांसाठी पाया घालण्यात आल्याने वाहतूक व्यवस्थेवर गंभीर परिणाम होणार आहे. स्थानिक नागरिकांनी याकडे लक्ष वेधून हे नियोजन कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्थित केला आहे. गेले दोन दिवस शहरात बांधलेल्या पायांवर डेकोरेटिव्ह पथदिव्यांचे खांब उभे केले जात आहेत. यात अनेक खांब बागायती झाडांच्या फांद्यामध्ये गुरफटले गेलेत, तर नगर परिषदेचे जुने पथदिवे जिथे आहेत, तिथेच हे नवे डेकोरेटिव्ह दिवे बसवले जात असल्याने दुप्पट खर्च आणि नियोजनातील त्रुटींबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. स्थानिकांचे म्हणण्यानुसार, आधीच शहरातील रस्ते अरुंद असून, पावसाळ्यात रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अशावेळी नव्या खांबांच्या पायाभरणीमुळे वाहतुकीचा प्रश्न अधिक गंभीर होणार आहे. काही ठिकाणी तर दोनचाकी आणि चारचाकी वाहनांना वळण घेण्यासाठीही जागा उरत नाही. त्यामुळे प्रशासनाने काम करताना रस्त्यांची रुंदी, वाहतूक आणि सुरक्षिततेचा विचार करावा, अशी मागणी होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.