रस्त्यावरील निराधारांचा आश्रयदाता
खारघर, ता. ३ (बातमीदार): रस्त्यावर उपाशीपोटी राहणारे वृद्ध, आजारामुळे मानसिक संतुलन ढासळलेले निराधार नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत.
अन्न, वस्त्र, निवारा अशा मूलभूत गरजांसाठी झगडणाऱ्या गलितगात्र अवस्थेतील वृद्धांसाठी खारघरचे मधुसूदन आचार्य आश्रयदाता बनले आहेत.
खारघरमध्ये वास्तव्य करणारे मधुसूदन आचार्य यांना खारघर हिरानंदानी पुलाखाली एक वयोवृद्ध व्यक्तीला पायाला जखम झाल्यामुळे चालता येत नव्हते. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नसल्यामुळे काय करावे, असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कोणी मदत केली नाहीतर त्या व्यक्तीचा मृत्यू होईल, अशी अवस्था झाली होती. अशा परिस्थितीत आचार्य यांनी महिनाभरात त्या व्यक्तीची सेवा केली होती. असाच काहीसा प्रसंग खारघर सेक्टर दहामधील स्मशानभूमीत राहणाऱ्या ओडिशा येथील व्यक्तीची झाली होती. अनेक दिवसांपासून पोटात अन्न नसल्यामुळे त्याला बोलताही येत नव्हते. त्या व्यक्तीला ठाणे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यानच त्याचे निधन झाले होते. त्यामुळे अशा निराधारांना आधार देण्यासाठी २०१६ मध्ये रायगड धर्मादाय आयुक्त कार्यालयात भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट या नावाचे वृद्धाश्रम सुरू केले. सद्यःस्थितीत या आश्रम ३० हून अधिक वृद्ध व्यक्ती असून, मधुसूदन आचार्य त्यांची निस्वार्थपणे सेवा करत आहेत.
------------------------------------------------
दुर्धर आजारांवर उपचार
पनवेलच्या शिवाजी चौकातील दुर्गामाता मंदिरच्या समोर एक वृद्ध व्यक्ती महिनाभरापासून एकाच जागी बसून असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते रंजित निकाळजे यांनी मधुसूदन यांना दिली होती. त्या वृद्धाच्या पायाला गंभीर दुखापत असल्याचे तसेच जखमी जागेवर किडे असल्याचे निदर्शनास आले. अशीच घटना कल्याणमधील ४३ वर्षीय राजेश चौधरी नावाच्या व्यक्तीसोबत झाली होती. आठ महिन्यांपूर्वी अपघातामुळे डावा पाय निकामी झाला होता. पदपथावर भीक मागून दिवस काढत होते. त्या व्यक्तीवरही मधुसूदन आचार्य यांच्या आश्रमात उपचार सुरू आहेत.
------------------------------------------
नवी मुंबई, पनवेल परिसरातील पदपथ, बस थांबे, मंदिर, मस्जिद, रेल्वेस्थानक, रेल्वे पुलाखाली असलेले वृद्ध व्यक्तींना पोलिस आणून सोडतात. त्याच्याशी प्रेमाने संवाद साधून त्यांचा घरचा पत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पुन्हा सुखरूप घरी सोडले जाते.
- मधुसूदन आचार्य, संस्थापक, भार्गवी शंकर चॅरिटेबल ट्रस्ट