कर्जतमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप
कर्जतमध्ये गणरायाला भावपूर्ण निरोप
६,०६८ घरगुती गणपती व आठ सार्वजनिक गौरी-गणपतींचे विसर्जन उत्साहात
कर्जत, ता. ३ (बातमीदार) : सात दिवसांच्या भक्तिमय वातावरणानंतर कर्जत तालुक्यात गणेशाला भावपूर्ण निरोप दिला. २७ ऑगस्ट रोजी गणरायाचे आगमन झाल्यानंतर सात दिवस संपूर्ण तालुका भजन, पूजाअर्चा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सामूहिक उपक्रमांनी दुमदुमून गेला होता.
कर्जत, नेरळ आणि माथेरान पोलिस ठाणे हद्दीत एकूण ६,०६८ घरगुती गणपती, २,६१९ गौरी तसेच आठ सार्वजनिक गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यात आले. यापूर्वी ३१ ऑगस्ट रोजी गौरींच्या विसर्जन सोहळ्यानेही भक्तिमय वातावरण अधिक रंगतदार केले होते. विसर्जनाच्या दिवशी सकाळपासूनच रस्त्यांवर ढोल-ताशांचा गजर, टाळ-झांजांचा निनाद आणि महिलांच्या ओवाळणीसह गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात गणरायाला निरोप देण्यात आला. नदी, नाले आणि कृत्रिम तलावांवर विसर्जनाची काटेकोर व्यवस्था पोलिस प्रशासन, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींकडून करण्यात आली होती. पर्यावरणपूरक विसर्जनासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यात आले. गर्दी नियंत्रण आणि सुरक्षेसाठी पोलिसांनी विशेष बंदोबस्त ठेवला होता. तसेच स्वयंसेवी संस्थांनी आणि युवकांनी मिरवणुकीदरम्यान वाहतूक नियंत्रणास मदत केली. गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत संपूर्ण तालुका भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. नागरिकांनी या सात दिवसांत धार्मिकच नव्हे तर सामाजिक एकतेचेही दर्शन घडवले. विसर्जनानंतरच्या पुढच्या वर्षी लवकर याच्या हाकेतून कर्जत तालुक्यातील गणेशभक्तीची प्रचीती पुन्हा एकदा आली. या उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सवाची सांगता झाली असली, तरी बाप्पाच्या पुनरागमनाची आतुरता आता सुरू झाली आहे.