माणगावमध्ये मोरयाचया गजरात गणरायाला निरोप

माणगावमध्ये मोरयाचया गजरात गणरायाला निरोप

Published on

माणगावमध्ये ‘मोरया’च्या गजरात गणरायाला निरोप
माणगाव, ता. ३ (बातमीदार) ः ‘गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... मंगलमूर्ती मोरया...’च्या गजरात माणगाव शहरासह तालुक्यातील दुर्गम भागात खासगी, घरगुती गणपतींचे तसेच गौरींचे काळ व गोद नदीपात्रातून तसेच तलावात उत्साहात विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात गणेशभक्तांनी शांततेत गणरायाचे विसर्जन केले. या वेळी माणगाव पोलिस ठाण्यातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
माणगाव तालुक्यात मंगळवारी (ता. २) दुपारी तीन वाजल्यापासून सायंकाळपर्यंत विसर्जन सुरू होते. काही गणेशभक्तांनी वाहनातून गणराय विसर्जनासाठी आणले. माणगाव येथील काळनदी, कळमजे येथील गोद नदीतील घाटाजवळ विसर्जन करण्यात आले. तसेच नगर पंचायतीचे कामगार गणरायाचे विसर्जन करण्यासाठी तैनात ठेवण्यात आले होते. तसेच साळुंके रेस्क्यू टीम या वेळी काळ नदीपात्रात तैनात ठेवण्यात आली होती. नगर पंचायतीतर्फे आलेल्या सर्व गणेशभक्तांचे स्वागत करण्यात आले. विसर्जन ठिकाणी माणगाव नगर पंचायतीतर्फे गणेशभक्तांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवांतर्गत पर्यावरणाचे रक्षण करावे, स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रमांतर्गत निर्माल्य पेटीत फुले टाकावीत, असा संदेश देण्यात आला. माणगाव नगर पंचायतीतर्फे गणेश विसर्जनाची चांगली व्यवस्था करण्यात आली होती. अत्यंत उत्साही वातावरणात व शांततेत माणगाव तालुक्यात पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. कोकणातील गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. त्यामुळे नोकरीनिमित्त बाहेरगावी असलेले कोकणवासी कुटुंबासहित गावाकडे येत असतात. त्‍यामुळे वाहतुकीची कोंडी व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्तदेखील तैनात करण्यात आला होता.

Marathi News Esakal
www.esakal.com