ठाणे पालिका भरती प्रक्रियेला मुदतवाढ

ठाणे पालिका भरती प्रक्रियेला मुदतवाढ

Published on

ठाणे पालिका भरती प्रक्रियेला मुदतवाढ
१७ सप्टेंबरपर्यंत करता येणार अर्ज; इच्छुकांसाठी संधी उपलब्ध
ठाणे, ता. ३ (बातमीदार) : ठाणे पालिका सेवेतून दर महिन्याला मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पोकळी निर्माण होत आहे. अशातच पालिकेतर्फे आरोग्य विभागासह अग्निशमन विभागातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, अर्ज दाखल करण्याची २ सप्टेंबर ही अंतिम मुदत होती, मात्र आता पालिकेने त्यात वाढ करून १७ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवली आहे. त्यामुळे इच्छुकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
ठाणे महापालिकेत शिक्षण मंडळासह नऊ हजार ८८ तर परिवहन सेवेत दोन हजार सहाशे कर्मचारी आहेत. सुमारे अडीच हजार कंत्राटी कामगार आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार ठाणे महापालिकेची लोकसंख्या १८ लाख ४१ हजार इतकी आहे. लोकसंख्या आता २५ लाखांच्या घरात गेली आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे ठाणे महापालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरील वाढलेला ताण कमी करण्यासाठी राज्य सरकारने आकृतीबंधमध्ये ८८० वाढीव पदांना मंजुरी देऊनही त्याची भरती होऊ शकलेली नाही. त्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्यादेखील दिवसागणिक वाढत आहे. यामुळेच सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.
ठाणे पालिका प्रशासनाने रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आरोग्य विभागासह सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते आणि अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांची मेगा भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यानुसार जाहिरातदेखील प्रसिद्ध करण्यात आली असून, यामध्ये वर्ग क आणि वर्ग ड ची तब्बल एक हजार ७७३ पदे कायमस्वरूपी भरली जाणार आहेत. अग्निशमनची ६०१ पदे भरली जाणार आहेत. यात फायरमनची ३८१, चालक २०७ आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी १३ या पदांचा समावेश आहे. त्यामुळे अग्निशमन विभाग सक्षम होणार असल्याचे दिसून येत आहे, तर दुसरीकडे आरोग्य यंत्रणेलादेखील बळकटी देताना यातील परिचारिका ४५७, प्रसाविका ११७, वॉर्ड बॉय ३७, ज्युनियर टेक्निशियन ६०, दवाखाना आया ४८, मॉरच्युरी अटेंडन्ट २८, शस्त्रक्रिया सहाय्यक २५, मल्टी पर्पज वर्कर ३३, सहाय्यक क्ष किरण तंत्रज्ञ आदींसह तब्बल ६५ प्रकारची पदे भरली जाणार आहेत.
दरम्यान, या पदांसाठी १२ ऑगस्ट २०२५ ते २ सप्टेंबर २०२५ या कालावधीत उमेदवारांना अर्ज दाखल करण्याची मुदत देण्यात आली होती, मात्र आता ही मुदत वाढविण्यात आली असून, १७ सप्टेंबरपर्यंत उमेदवार अर्ज दाखल करू शकतात, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. उमेदवारांना अर्ज करताना आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे पालिकेच्या आस्थापना विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.

चौकट
अभियंत्यांची पदे भरली जाणार
ठाणे शहरातील विकासकामात सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते महत्त्वाची भूमिका बजावतात. या विभागातील ३०० मंजूर पदांपैकी १६६ पदे रिक्त असून, केवळ १३४ पदांवर अभियंते कार्यरत आहेत. यामध्ये कनिष्ठ अभियंता (१) या संवगार्तील मंजूर १२६ पदांपैकी ४६ पदे कार्यरत असून, ८० पदे रिक्त आहेत. कनिष्ठ (२) या संवर्गातील मंजूर ६८ पदांपैकी दोन पदे कार्यरत असून, ६६ पदे रिक्त आहेत. अखेर आता पालिकेतर्फे या रिक्त पदांसाठीदेखील भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून, कनिष्ठ अभियंता एक (नागरी) - २४, कनिष्ठ अभियंता एक (यांत्रिक) - १६, कनिष्ठ अभियंता (विद्युत) - चार, कनिष्ठ अभियंता -दोन अशी ६३ पदे भरली जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com