श्रींच्या निरोपासाठी ठाणे सज्ज
श्रींच्या निरोपासाठी ठाणे सज्ज
महाविसर्जन घाटांवर चोख बंदोबस्त
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ४ : १० दिवसांच्या पाहुणचारानंतर लाडक्या गणरायाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे. त्यामुळे ठाणे शहरात उत्साहाची लाट असून, विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला वेग आला आहे. आगमनासारखीच विसर्जन मिरवणूकदेखील दणक्यात पार पाडण्यासाठी मंडळांची लगबग सुरू आहे. हा संपूर्ण सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावा, यासाठी ठाणे महापालिका आणि पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. दीड, पाच आणि सात दिवसांच्या घरगुती गणपतींचे विसर्जन याआधीच पार पडले असून, आता अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवार (ता. ६) रोजी १० दिवसांचे सार्वजनिक आणि उर्वरित घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. त्यासाठी ठाणे शहरातील महाविसर्जन घाट सज्ज आहेत. विसर्जन घाटाच्या स्वच्छतेपासून ते सुरक्षेपर्यंत सर्व बाबींची पूर्तता करण्यात आली असून, अधिकचे मनुष्यबळही या वेळी तैनात ठेवण्यात येणार आहे.
ठाणे पोलिस आयुक्तालय क्षेत्रात यंदा १० दिवसांच्या ४३ हजार ५३५ घरगुती, तर ७९४ सार्वजनिक गणपतींची स्थापना झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक मंडळांच्या संख्येत वाढ झाली आहे. यामध्ये ठाणे-१०१, भिवंडी-१५०, कल्याण-१७२, उल्हासनगर-२२२ आणि वागळे-१४९ इतकी सार्वजनिक गणपतींची संख्या आहे. ठाणे पालिका क्षेत्रात ठाणे आणि वागळे परिमंडळ येत असल्याने यावर्षी सुमारे २५० सार्वजनिक, तर १० हजारांपेक्षा जास्त श्रींच्या मूर्तींचे विसर्जन शनिवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी होण्याची शक्यता आहे. हा महासोहळा व्यवस्थित पार पडावा, यासाठी पोलिसांसोबत ठाणे महापालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे.
क्रेन, वाढीव बार्ज
गणेशमूर्तींचे विधिवत वाहत्या पाण्यात विसर्जन व्हावे, या दृष्टिकोनातून महापालिकेच्या वतीने पारसिक रेतीबंदर, कोलशेत, कोपरी (चेंदणी कोळीवाडा) कळवा पूल (निसर्ग उद्यान), कळवा (ठाणे बाजू), बाळकूम घाट आणि दिवा घाट, असे एकूण नऊ विसर्जन घाट तयार करण्यात आले आहेत. सहा फुटांपेक्षा जास्त उंचीच्या मूर्तींचे येथे विसर्जन होणार आहे. या घाटांची स्वच्छता करण्यात आली असून, विसर्जन व्यवस्था उभारली आहे. यावर्षी विसर्जनाच्या दिवशी दोन सत्रांत मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. विशेष म्हणजे विसर्जनासाठी क्रेन आणि वाढीव बार्जही ठेवण्यात आले आहेत.
कृत्रिम तलावात विसर्जनाचा आग्रह
सहा फुटांखालील मूर्तींच्या विसर्जनासाठी सर्व प्रभाग समित्यांमध्ये मिळून एकूण २३ कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. या तलावांमध्ये केवळ घरगुतीच नव्हे तर सहा फुटांखालील सार्वजनिक गणेशमूर्तींचेही विसर्जन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, फिरती विसर्जन व्यवस्था आणि १० मूर्ती स्वीकृती केंद्र यासह पालिका क्षेत्रामध्ये १३४ ठिकाणी गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था
मूर्ती विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मार्ग आखून देण्यात आले आहेत. गणेशभक्तांच्या वाहनांसाठी वाहनतळ, पाणबुडी पथक, अग्निशमन दल, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय पथक आणि प्रसाधनगृह अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.