पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा

पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा

Published on

पिण्याच्या पाण्यासाठी पावसाची प्रतीक्षा
कल्याण, ता. ७ (बातमीदार) : चिंचपाडा परिसरात गणेश विसर्जनाच्या दिवशी अघोषितपणे पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांना प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. मॉडेल कॉलेज परिसरातील अनेक चाळींमध्ये पाणी न मिळाल्याने रहिवाशांना पावसावरच अवलंबून राहावे लागत आहे. घरातील पाणी संपल्याने लोक छताखाली भांडी लावून पावसाचे पाणी जमा करून ते पिण्यासाठी व इतर वापरासाठी वापरत आहेत.

मागील महिन्यात भाजपाने अशुद्ध आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याविरोधात मोठे जनआंदोलन केले होते. त्यानंतर महापालिका प्रशासनाने वेळ घेतला असला तरी नागरिकांचे त्रास कमी झालेले नाहीत. चिंचपाडा रोड चाळ परिसरातील रहिवाशांना मिळणारे पाणे अपुरा आणि अस्वच्छ असल्याने ते पावसाचे पाणी जमा करून उकळवून पिण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. अशुद्ध पाण्यामुळे साथीचे आजार होण्याची भीती असल्याने नागरिकांना निसर्गावर अवलंबून राहावे लागत आहे.

महापालिका कर भरण्यासाठी सतत आवाहन करीत असतानाही पाणीप्रश्न अद्याप कायम असल्याने नागरिकांत असंतोष आहे. कर भरूनही जर पाणीपुरवठा नाही तर कराचा उपयोग काय, असा सवाल येथील रहिवाशांकडून व्यक्त होत आहे. प्रशासनावर नागरिकांचा विश्वास कमी होत असून, सततचा पाऊस असला तरीही पिण्याच्या पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागणे वाईट परिस्थिती आहे. याबाबत अनिता पाटील यांनी प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com