१२ टन निर्माल्यापासून गांडूळ खत
१२ टन निर्माल्यापासून गांडूळ खत
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा पर्यावरणपूरक संकल्प
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर फुले, हार, पाने यांचं निर्माल्य जमा होतं. पूर्वी या सर्व गोष्टी नदी, तलाव किंवा खाडीत टाकल्या जात असत, ज्यामुळे जलप्रदूषण वाढत होतं. हे टाळण्यासाठी डोंबिवलीत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने यंदाही एक उपयुक्त उपक्रम राबवला. यावर्षी त्यांनी डोंबिवली, ठाकुर्ली, खोणी, वाकळण, डायघर, खिडकाळी, दहीसर अशा परिसरातील २३ पेक्षा अधिक विसर्जनस्थळांवर सुमारे १२ टन निर्माल्य जमा केले. त्यात ३.५ टन फुलांच्या पाकळ्या वेगळ्या करून उंबार्ली येथे नेण्यात आल्या. तिथे त्या पाकळ्यांपासून गांडूळ खत तयार केले जात आहे.
गणेशोत्सव हा भक्तिभावासोबतच पर्यावरणाबदल जागरूकतेचा संदेश देणारा उत्सव ठरावा या उद्देशाने नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने दरवर्षीप्रमाणे आगळावेगळा आणि कौतुकास्पद संकल्प राबवला आहे. विसर्जनावेळी जमा होणारे निर्माल्य नदीत टाकून जलप्रदूषण वाढवण्याऐवजी त्याच निर्माल्याचा वापर करून गांडूळ खत तयार करण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात सुमारे साडेबारा टन निर्माल्य जमा केले आहे.
जलप्रदूषणात वाढ होत असल्याने सण उत्सवांच्या काळात नदीत, तलावांत सोडले जाणारे निर्माल्य हेही प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. दीड दिवसाचे गणपती, गौरी-गणपती, पाच दिवसांचे गणपती, अनंत चतुर्दशी दिवशी खाडीकिनारी, नदीकिनारी, तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. परंपरेप्रमाणे हे निर्माल्य थेट पाण्यात सोडले जाते; मात्र जलप्रदूषणात होणारी वाढ टाळण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या शेकडो श्रीसदस्यांनी मिळून विसर्जन घाटांवर निर्माल्य संकलन आणि त्यापासून खतनिर्मितीचा उपक्रम राबविला.
गणेशमूर्तींसोबत आणलेल्या निर्माल्याचे या ठिकाणी संकलन केले. प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी या संकलित केलेल्या निर्माल्यामधील दोरा, प्लॅस्टिक, कागद आणि इतर अनावश्यक वस्तू बाजूला काढल्या आणि फुलांच्या पाकळ्या वेगळ्या केल्या. एकूण साडेतीन टनाहून अधिक पाकळ्यांचे संकलन करण्यात आले. जमा केलेल्या पाकळ्या उंबार्ली येथे नेऊन त्यापासून गांडूळ खत तयार केले जाते. हे खत उंबार्ली व इतर ठिकाणी प्रतिष्ठानतर्फे लावलेल्या वृक्षांना पुरवले जाते. आजपर्यंत, डोंबिवली आणि ठाकुर्ली भागात प्रतिष्ठानने सहा हजार ५०० पेक्षा जास्त वृक्षांची लागवड केलेली आहे आणि पाच टनापेक्षा अधिक गांडूळ खत तयार केले आहे.
डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रतिष्ठान अनेक समाजोपयोगी कार्य करत आहे, जसे बैठकीच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, बालसंस्कार मार्गदर्शन, वृक्षलागवड व संवर्धन, जल पुनर्भरण, स्वच्छता अभियान, विहिरी व तलावांची स्वच्छता, आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, व्यव्यसाय मार्गदर्शन इत्यादी. तसेच या प्रतिष्ठानचे कार्य फक्त भारतातच नाही, तर अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, नॉर्वे, दुबई आणि कतारसारख्या अनेक देशांमध्येही सुरू आहे. आजपर्यंत या प्रतिष्ठानतर्फे अमेरिका आणि इतर देशांमध्ये ही स्वच्छता अभियान, वृक्षलागवड, ब्लड आणि प्लाझ्मा डोनेशन, कर्करोग अवेरनेस इत्यादी उपक्रम राबवले आहेत.
या ठिकाणी संकलन
डोंबिवली पूर्व पश्चिम, ठाकुर्ली तसेच ग्रामीण विभाग जसे की खोणी, वाकळण, डायघर, खिडकाळी, दहीसर या भागातील विसर्जनस्थळांवर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांनी निर्माल्य संकलन व त्यापासून खतनिर्मितीचे कार्य केले. २३ हून अधिक विसर्जनस्थळांवर हे कार्य केले, तसेच प्रतिष्ठानच्या श्रीसदस्यांमार्फत पोलिस मित्र म्हणूनदेखील काम करण्यात आले. या कार्यात दोन हजारांहून अधिक श्रीसदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.