सार्वजनिक गणेशोत्सवाची सांगता
टिळकनगरच्या राजाची पालखीतून मिरवणूक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ७ : डोंबिवलीतील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदा गणेशोत्सवाचे ७६ वे वर्ष साजरे केले आणि हा गणेशोत्सव अत्यंत पारंपरिक, भक्तिपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडला. हा उत्सव गेली अनेक वर्षे परंपरा आणि संस्कृती जपत साजरा होत आला आहे. यंदा विशेष म्हणजे, उत्सवाचे संपूर्ण नियोजन आणि जबाबदाऱ्या युवा कार्यकर्त्यांकडे सोपवण्यात आल्या होत्या. त्यांनीही ती मोठ्या उत्साहाने आणि जबाबदारीने पार पाडली.
गेली २४ वर्षे मंडळासाठी सजावट करणारे संजय धबडे यांनी यंदा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीतील १२ ऐतिहासिक किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या होत्या. ज्या पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. धार्मिक कार्यक्रमांमध्ये गणपती अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने, श्री विष्णू सहस्त्रनाम, सत्यनारायण पूजा, कोकणातील पारंपरिक आरत्या, भोवत्या आणि ७६ प्रकारच्या अन्नांचा अन्नकोट यांचा समावेश होता.
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला टिळकनगर गणेशोत्सव मंडळाचे स्वतःचे खास वैशिष्ट्य आहे. गणपतीची मूर्ती पालखीत विराजमान असते, पुढे लेझीम पथक, ढोल-ताशा आणि झांज-झेंडे घेऊन चालणारे नगरवासी असतात. यंदा विशेष आकर्षण ठरले ते ५२ लहान मुले-मुलींचे लेझीम पथक, जे गेल्या दोन महिन्यांपासून सराव करत होते. त्यांच्या तालबद्ध सादरीकरणाने मिरवणुकीला वेगळीच शोभा आली. त्यांनी साकारलेले मानवी मनोरे पाहून लोक थक्क झाले. मंडळाचे अध्यक्ष सचिन आंबेकर यांनी सांगितले की, यंदा तरुण कार्यकर्त्यांनी उत्तम नेतृत्व करत परंपरेचा वारसा पुढे नेला आहे.
अथर्वशीर्षाचे पठण
पावसाची संततधार, चिखल, खड्ड्यांनी भरलेले रस्ते यामुळे अडचण निर्माण झाली असली, तरी लहानग्यांच्या उत्साहावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. मिरवणुकीदरम्यान ताई पिंगळे चौकात पोहोचल्यावर सर्व कार्यकर्ते आणि भाविक एकत्र जमून सामूहिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. एकसुरात आणि जोरदार आवाजात झालेले हे पठण ऐकताना संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर एक भावनिक प्रार्थना म्हणून बाप्पाला निरोप देण्यात आला. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आले. सर्वांनी पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती करत गणरायाला निरोप दिला.