जखमी मजुराच्या पाठीवर माणुसकीचा हात

जखमी मजुराच्या पाठीवर माणुसकीचा हात

Published on

जखमी मजुराच्या पाठीवर माणुसकीचा हात
औषधोपचार करून सुखरूप लातूरला पोहोचविले
माणगाव, ता. ९ (वार्ताहर) ः आजच्या धावपळीच्या, यंत्रमानव होत चाललेल्या जगात स्वार्थीपणा आणि निर्दयीपणाचे अनेक किस्से ऐकायला मिळतात. मात्र माणगाव शहरात घडलेल्या एका घटनेत जागरूक नागरिक अरुण पवार यांनी दाखवलेली मदतीची भावना आणि माणुसकीचा हात संपूर्ण समाजाला आदर्श ठरणारी आहे. गोव्यातील मडगाव येथे निर्दयी मारहाणीचा बळी ठरलेला, गंभीर जखमी अवस्थेत असहाय्य मजूर यल्लाप्पा मुकिंदा चव्हाण याला त्यांनी केवळ मदतच केली नाही, तर औषधोपचार करून सुखरूप लातूरला पोहोचवून मानवतेचे खरे दर्शन घडवले.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील यल्लाप्पा चव्हाण (वय ४५) हा पोटापाण्यासाठी गोव्याला गेला होता. मडगाव येथे मजूर म्हणून काम करीत असताना, एका हॉटेलमध्ये जेवण घेताना त्याला काही मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने क्षुल्लक कारणावरून जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये त्याचे कान फाटले, डोक्याला व मस्तकाला गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांनी एकूण १४ टाके घातले. त्याशिवाय पोट, पाठ, छाती आणि अगदी गुप्तांगावरही जबरदस्त मार लागला होता. दात आणि जबड्याला सूज आल्याने त्याला नीट जेवताही येत नव्हते. त्याला अक्षरशः कुटून काढण्यात आले. मोबाईल, पैसे, आधार कार्ड, कपडे असे सर्व काही हिसकावून घेतले गेले. जीव वाचविण्यासाठी तेथील पोलिसांनी हस्तक्षेप करून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. उपचार झाल्यावर दोन दिवसांनी त्याला एका टेम्पोत बसवून मुंबईकडे रवाना केले. मात्र वाटेत कसाबसा तो माणगाव येथे उतरला. शनिवार, ६ सप्टेंबरच्या सकाळी हा जखमी आणि उपाशीपोटी मजूर माणगाव शहरातील मोरबा रोड परिसरात इकडे तिकडे भटकत होता. भुकेने व्‍याकूळ होऊन अन्नाची मागणी करीत होता. अशातच ही आर्त विनंती ऐकून अरुण पवार यांनी त्‍याला मदतीचा हात दिला. त्यांनी चौकशी केली असता संपूर्ण सत्य समोर आले. त्या वेळी यल्लाप्पाच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू, फाटके कपडे आणि जखमी अवस्थेतील अंगावर उठलेले व्रण हे दृश्य हेलावून टाकणारे होते. तत्‍काळ अरुण पवार यांनी यल्लाप्पाला चहा व नाश्ता दिला. त्यानंतर लातूरला जाण्यासाठी एक हजार रुपये, सोबत खाऊ व पाणी दिले. त्याला स्वतःच्या दुचाकीवर बसवून माणगाव एसटी बसस्थानकात नेले. तिथे पुण्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून कंडक्टरलाही यल्लाप्पाला लातूरपर्यंत पोहोचण्यास मदत करण्याची विनंती केली. याचबरोबर स्वतःचा पत्ता व मोबाईल क्रमांक लिहून देत प्रवासात काही अडचण आली तर लगेच फोन करण्याची सूचनाही पवार यांनी यल्लापाला केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com