रेल्वे गर्डरवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका
रेल्वे गर्डरवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका
डोके, पाठीला गंभीर दुखापत
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ७ : ठाण्यातील सिडको रेल्वे ब्रिजजवळील कमी गतीच्या रेल्वे ट्रॅकखाली लोखंडी गर्डरमध्ये प्रकाश कांबळे (वय ४०, कळवा) हे पाय घसरून पडल्यामुळे गर्डरमध्ये अडकले होते. ही घटना रविवारी (ता. ७) सकाळी सव्वानऊ ते साडेनऊच्या दरम्यान समोर आली. लोकल ट्रेन येत असल्याने पायी रेल्वे ट्रॅकवरून चालत असताना प्रकाश कांबळे बाजूला होण्यासाठी प्रयत्न करीत असताना ते अचानक पडले. त्याच्या डोक्याला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच ठाणे लोहमार्ग पोलिस, ठाणे नगर पोलिस, ठाणे महापालिकेचे अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन कक्षातील जवान आणि कर्मचाऱ्यांनी तत्परतेने घटनास्थळी धाव घेत काम सुरू केले. त्यांनी खाली उतरून प्रकाश कांबळे यांची गर्डरमधून सुटका केली. जखमीला तत्काळ उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी यांनी दिली.