
पर्यावरण संवर्धनाची संकल्पपूर्ती
गणेशोत्सवात नवी मुंबईतून ६३ टन निर्माल्य जमा
वाशी, ता. ८ (बातमीदार) : दरवर्षीप्रमाणे नवी मुंबईत गणेशोत्सवाचा सोहळा रंगला. या वेळी निर्माल्याचा पर्यावरणावर होणारा विपरीत परिणाम टाळण्यासाठी नवी मुंबई महापालिका तसेच विविध सामाजिक संस्थांच्या सहकार्यातून जवळपास ६३ टन निर्माल्य संकलित करण्यात आले.
नवी मुंबईत श्रींच्या मूर्तींसोबत विसर्जन स्थळी आणले जाणाऱ्या पुष्पमाला, फुले, दुर्वा, शमी यासारखे पुनर्प्रक्रिया करण्यायोग्य ओले निर्माल्य तसेच मूर्तीच्या गळ्यातील कंठी, सजावटीचे सामान असे सुके निर्माल्य टाकण्यासाठी स्वतंत्र कलशांची व्यवस्था करण्यात आली होती. या वस्तू पाण्यात टाकण्याला महापालिकेकडून प्रतिबंध करण्यात आला होता. त्याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला असून, निर्माल्याची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली होती. याच माध्यमातून गणशोत्सवाच्या कालावधीत जवळपास ६३ टन ६९५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर महापालिकेच्या तुर्भे प्रकल्पस्थळी पावित्र्य जपत खतनिर्मिती केली जाणार आहे.
-------------------------------------------
उद्यानांमध्ये खतांचा वापर
नवी मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात दीड दिवसाच्या गणरायाच्या विर्सजनाच्या दिवशी १४ टन २०५ किलो, पाचव्या दिवशी १० टन ९८० किलो, सातव्या दिवशी २४ टन ४४० किलो आणि दहाव्या दिवशी १४ टन ७० किलो असे एकूण ६३ टन ६९५ किलो निर्माल्य जमा झाले आहे. या निर्माल्यावर प्रक्रियेतून खतनिर्मिती करण्यात येणार असून, त्याचा वापर उद्यानांमध्ये तसेच विविध वृक्षारोपण उपक्रमात केला जाणार आहे.
------------------------------------------
गणेशोत्सवाच्या कालावधीत निर्माल्य टाकण्यासाठी पालिकेने विशेष सुविधा केली होती. भाविकांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. पालिकेकडून १० दिवसांच्या कालावधीत ६३ टन निर्माल्य जमा झाले. त्याचा वापर शहरातील उद्यानांमध्ये होणार आहे.
-डॉ. अजय गडदे, उपआयुक्त घनकचरा व्यवस्थापन, पालिका
-------------------------------
जमा झालेले निर्माल्य
विभाग किलो
बेलापूर ८,५८०
नेरूळ ७,३६०
वाशी ९,०२५
तुर्भे ८,५२०
कोपरखैरणे १०,८९५
घणसोली ९,७०५
ऐरोली ७,५७०
दिघा २,०४०