जिल्हा रुग्णालयाने केली पाच हजार बालकांवर शस्त्रक्रिया
जिल्हा रुग्णालयाकडून पाच हजार बालकांवर शस्त्रक्रिया
आजारी बालकांचा शोध घेण्यासाठी ३२ आरोग्य पथके स्थापन
ठाणे शहर, ता. ९ (बातमीदार) ः विठ्ठल सायण्णा जिल्हा सामान्य रुग्णालयाने पाच वर्षांत जिल्ह्यातील पाच हजार ३७९ बालकांवर शस्त्रक्रिया करून त्यांना जीवनदान दिले आहे. जिल्हा रुग्णालयाने राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत आजारी बालकांचा शोध घेण्यासाठी ३२ आरोग्य पथके स्थापन केली असून यामार्फत विविध शिबिरे राबवण्यात येतात.
ठाणे जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्याकडे प्रशासनाकडून भर दिला जात आहे. जिल्हा रुग्णालयाने मागील पाच वर्षांत ६९७ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करून जीवनदान देण्याचे काम केले आहे. सोबतच अंगणवाड्यांपासून शाळांपर्यंत आरोग्य तपासणी आणि गंभीर आजारांवर मोफत उपचार-शस्त्रक्रिया अशा व्यापक उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील चार हजार ६८२ बालकांवर इतर आजारांकरिता शस्त्रक्रिया केल्या आहेत. राज्यातील मान्यताप्राप्त रुग्णालयांमध्ये एप्रिल २०२५ पासून आजपर्यंत ३३ बालकांवर मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
‘या’ आजारांचा समावेश
जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयांकडून करण्यात आलेल्या बालकांच्या शस्त्रक्रियांमध्ये हर्निया, फायमोसिस, चरबीच्या गाठी, चिकटलेली बोटे, टंग टाय, फाटलेले ओठ-टाळू, डोळ्यांचा तिरळेपणा अशा आजारांचा समावेश होता. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या बालकांचा पुढील वैद्यकीय पाठपुरावा सुरू ठेवण्यात आला असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
एका दिवसात शंभर बालकांवर शस्त्रक्रिया
जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित केलेल्या विशेष शिबिरात सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली एका दिवसात तब्बल १०० बालकांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. एकाच दिवसात झालेल्या या शस्त्रक्रियांनी इतिहास घडवला असल्याचे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाचे जिल्हा कार्यक्रम पर्यवेक्षक विनोद जोशी यांनी सांगितले.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्ह्यातील ३२ पथके सातत्याने अंगणवाडी व शाळांमध्ये जाऊन बालकांची तपासणी, उपचार व शस्त्रक्रियेनंतरचा पाठपुरावा करीत आहेत. प्रत्येक पथकात महिला व पुरुष वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माता व सहाय्यक परिचारिका कार्यरत आहेत.
पाच वर्षांत बालकांवरील शस्त्रक्रिया
हदयविकार शस्त्रक्रिया - ६९७
इतर आजारांवरील शस्त्रक्रिया - ४,६८२
तिरळेपणावरील शस्त्रक्रिया - ३०७
जिल्हा सामान्य रुग्णालयाची बालकांवरील उपचार यंत्रणा सक्षम आणि आधुनिक आहे. येथे अर्भकांचीही उत्तम काळजी घेतली जाते. महिला प्रसूती कक्ष आणि तेथील डॉक्टर, आरोग्य कर्मचारी निष्णांत आहेत. राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम ठाणे जिल्ह्यात बालआरोग्याचा खंबीर पाया घालत आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.