पारंपरिक ‘कीव’ पद्धतीने शेतकऱ्यांची मासेमारी
कासा, ता. ९ (बातमीदार) : डहाणू तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी सध्या पारंपरिक ‘कीव’ पद्धतीने मासेमारी करीत आहेत. सूर्या नदी व तिच्या उपनद्यांच्या किनारी, तसेच शेतातून वाहणाऱ्या पाण्यात बांबू, दगड, सागाची पाने व लाकडांचा वापर करून ‘कीव’ उभारला जातो. या पद्धतीतून मिळणारे मासे शेतकऱ्यांसाठी पावसाळ्याच्या दिवसांत तात्पुरत्या उदरनिर्वाहाचे साधन ठरत आहेत.
धामणी व कवडास धरणांतून सोडलेले पाणी सूर्या नदीत मिसळून ओहळ-नाल्यांमार्गे शेतात पोहोचते. या पाण्यासोबत कडवाळी, मळे, कोळंबी, मूरी शेगाचा, पात्या यांसारखे लहान मासेही शेतात व डबक्यात प्रवेश करतात. अशावेळी शेतकरी कीव, वाल, साटा किंवा मलई अशा नावांनी ओळखल्या जाणाऱ्या पारंपरिक साधनांचा वापर करून मासे पकडतात. काही ठिकाणी बांबूच्या काड्यांनी गोलाकार विणलेली मलईदेखील मोठ्या प्रमाणावर उपयोगात येते.
भातकापणीला सुरुवात होईपर्यंत शेतकऱ्यांकडे फारसे शेतीकाम नसल्याने या काळातली मासेमारी त्यांना आर्थिक हातभार लावते. शेतमजूरदेखील कीव बांधून मासेमारी करून उदरनिर्वाह करतात. यामुळे जेवणासाठी लागणारी भाजी सहज मिळते. अधिक मासे मिळाल्यास त्यांची विक्री करून थोडा आर्थिक लाभ होतो. तसेच जास्त मासे मिळाल्यास त्यांना उन्हात वा चुलीवर सुकवून ‘दंडावण’ तयार केली जाते. लहान मूरी मासे पळस वा सागाच्या पानात मसाल्यासह गुंडाळून भाजून ‘पातोली’ म्हणूनही खाल्ले जातात.
मासेविक्रीतून उपजीविकेचे साधन
सध्याच्या दिवसांत भातलावणी संपली असून, हाताला फारसे काम नसते. त्यामुळे आम्ही ओहळात कीव करून ठेवतो. प्रवाहाबरोबर मासे जाळ्यात अडकतात. त्यांची भाजी करून घरचा स्वयंपाक भागतो आणि कधी जास्त मासे मिळाले, तर विक्रीतून थोडे पैसेही मिळतात, असे फणसवाडी येथील शेतकरी कमलेश कुरकुटे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.