जलबोगद्यामुळे शेतीसह घरांना धोका

जलबोगद्यामुळे शेतीसह घरांना धोका

Published on

जलबोगद्यामुळे शेतीसह घरांना धोका
बेलवडेमध्ये खासगी कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
पेण, ता. ९ (वार्ताहर) : पेण तालुक्याच्या हेटवणे धरणातून नवी मुंबईला सिडकोद्वारे जाणाऱ्या पाण्यासाठी बेलवडे आणि जिते या ठिकाणी ३०० फूट जलबोगद्याची निर्मिती केली आहे. मात्र बेलवडे हद्दीतील खोदण्यात आलेल्या जलबोगद्यामुळे येथील शेतीचे तसेच घरांचे नुकसान झाले असून, हे काम करणाऱ्या मेघा इंजिनियर कंपनीने येथील शेतकऱ्यांना फसविल्याचे सांगण्यात आले.
एकीकडे पेणच्या वाशी खारेपाट विभागातील नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी व्याकूळ असताना, नवी मुंबईच्या जनतेसाठी सिडकोद्वारे हेटवणे धरणाचे पाणी जलद गतीने जाण्यासाठी बेलवडे ते जिते अशा दोन ठिकाणी ३०० फूट जलबोगदा खोदण्यात आला आहे. यासाठी ब्लास्टिंग होत असताना बेलवडे हद्दीतील अनेक शेतकऱ्यांचे तसेच घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन अनेक घरांना तडे गेले आहेत. या जलबोगद्याचे काम एका खासगी इंजिनियर कंपनीने घेतले असून, सुरुवातीला येथील नुकसानीची शेतकऱ्यांना तसेच घरमालकांना भरपाई देण्याचे ठरविले होते. तसेच रस्त्यातून होणाऱ्या अवजड वाहतुकीमुळे येथील रस्त्याची दुरवस्‍था झाली आहे. दरम्यान, कंपनीकडून या खराब रस्‍त्‍याची दुरुस्‍ती करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. परंतु कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केली असल्याने आता आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे हेटवणे धरणाचे पाणी प्रथम पेणकरांना मिळत नसल्याने हा संघर्ष पेटणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. तर बेलवडे येथे ३०० फूट खोदण्यात आलेल्या जलबोगद्यासाठी ब्लास्टिंग झाली नसून, याचा धरणाला कोणताही धोका नाही, अशी चुकीची आणि खोटी माहिती देणाऱ्या तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक नरेश पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप रेणुका पाटील यांनी केली आहे.
...............
हेटवणे धरणाचे पाणी नवी मुंबईला जलबोगद्याद्वारे जाण्यासाठी बेलवडे हद्दीत ३०० फूट खोल खोदताना तसेच ब्लास्टिंग करताना येथील शेतीसह अनेक घरांना तडे गेले आहेत. त्या दरम्यान संबंधित कंपनीने सर्व्हे करून नुकसानभरपाई देण्याचे कबूल केले होते; परंतु जवळपास एक वर्ष होत आले आहे तरी कोणतीच भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे याकरिता लवकरच आंदोलन करण्यात येणार आहे.
-प्रवीण पाटील, स्थानिक शेतकरी, बेलवडे
..........
बेलवडे गावाच्या हद्दीत पाण्याच्या लाईनसाठी बोगद्याची निर्मिती होत असताना, संबंधित कंपनीने शेतीचे नुकसान केले आहे. माती, डबल, खडी शेतात गेल्याने शेती नापीक होऊन ब्लास्टिंगदरम्यान अनेकांच्या घरांना तडे गेले आहेत. तसेच रस्त्यांचीसुद्धा दुरवस्था झाली आहे. कंपनीच्या अवजड वाहनांमुळे ग्रामस्थांना रस्त्यातून जाता-येता धोका निर्माण झाला असल्याचे याबाबत ग्रामपंचायतीच्या वतीने पत्र दिले आहे. परंतु कोणतीच नुकसानभरपाई कंपनीने केलेली नाही.
- हरेश पाटील, सरपंच, बेलवडे ग्रामपंचायत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com