जिल्ह्याला मिळणार कडेकोट सुरक्षा
भरत उबाळे : सकाळ वृत्तसेवा
शहापूर, ता. ९ : ठाणे व पालघर जिल्ह्यात शासकीय रुग्णालयांचा वाढता परिसर, इमारती व रुग्णालयीन सुरक्षेबाबत निर्माण होणाऱ्या समस्या; तसेच बाळ पळवण्याच्या घटना, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांना अटकाव घालण्यासाठी सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य विभागाने पुढाकार घेतला आहे. यासाठी ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील महिला व बाल रुग्णालये, सामान्य रुग्णालये, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांसाठी मोठ्या संख्येने आऊटसोर्सिंगद्वारे सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार आहेत. या दोन्ही जिल्ह्यांतील सरकारी रुग्णालयांना कडेकोट सुरक्षा देण्यात येणार आहे.
राज्यातील अनेक शासकीय रुग्णालयात नातेवाइकांचा मृत्यू झाल्यानंतर अनेकदा मारहाणीच्या घटना घडत असतात. याचा ताण साहजिकच डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांवर येत असतो, त्यामुळे सुरक्षारक्षक नेमणुकीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात रुग्णालयांसाठी १३८, तर पालघरमधील रुग्णालयांसाठी ८७ सुरक्षारक्षकांची लवकरच नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी १२० कोटी ५ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीला मंजूरी देण्यात आली आहे. वर्ष २०२५-२६ ते २०२७-२८ या तीन वर्षांसाठी बाह्य यंत्रणेद्वारे सुरक्षारक्षकाची सेवा घेण्यास प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मदतीने त्यांच्या कार्यालयाचे मोजमाप आणि जिल्ह्यातील रुग्णालये निश्चित करून त्यानुसार सुरक्षारक्षकांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. सरकारने मान्यता दिलेली सुरक्षा मंडळे, माजी सैनिक रक्षक मंडळ (मेस्को) अथवा सुरक्षारक्षक दलामार्फत सुरक्षारक्षक घेण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. मात्र, त्यांच्यामार्फत सेवा उपलब्ध न झाल्यास सर्व रुग्णालयांसाठी ई-निविदा प्रक्रिया एकाच वेळी आणि राज्य स्तरावरून पार पाडण्यात येणार आहे.
गरजेनुसार रक्षकांची मंजुरी
अत्यंत पारदर्शक पद्धतीने बाह्य यंत्रणेची निवड केली जाणार आहे. यामध्ये रुग्णालयांसाठी मान्य केलेल्या सुरक्षारक्षकांची संख्या ही कमाल मर्यादा असून, स्थानिक गरजेनुसार त्यांची संख्या किती असावी, हे निश्चित करून मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा शल्यचिकित्सकांना देण्यात आले आहेत. पारदर्शकतेसाठी सुरक्षारक्षकांचे वेतन त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची खात्री केल्याशिवाय पुढील महिन्याचे वेतन अदा केले जाणार नाही, अशी अटही निविदेत समाविष्ट करण्यात येणार आहे.
ठाणे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये यापूर्वीच बाह्ययंत्रणेद्वारे सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. त्यात एखाद्या ठिकाणी वाढ करायची असल्यास तसा निर्णय घेण्यात येईल. सध्याच्या परिस्थितीत रुग्णालयांसाठी सुरक्षारक्षक नेमणे ही महत्त्वाची गरज बनली आहे.
- डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्यचिकित्सक, ठाणे
सुरक्षेसाठी मोठा निर्णय
ठाणे जिल्हा : १३८ रक्षक
पालघर जिल्हा : ८७ रक्षक
एकूण निधी : १२० कोटी ५ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.