एसटी प्रवाशांच्या तक्रारींसाठी व्यासपीठ
पालघर, ता. ९ : एसटी प्रवासी व प्रशासनाच्या समस्यांशी संबंधित समस्या व तक्रारी मांडण्यासाठी स्थानिक पातळीवर दर बुधवारी तक्रार निवारणाचे व्यासपीठ प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यासाठी १० सप्टेंबर ते १० डिसेंबरपर्यंत प्रत्येक बुधवारी प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन आयोजित करण्यात आला आहे. प्रवाशांनी या दिवशी आपल्या तक्रारी व समस्या संबंधित आगारांमध्ये नोंदवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यातील विविध आगारांमध्ये जवळपास ४१० बस धावत आहेत. एसटीच्या विविध बसमधून दररोज जवळपास ५० लाखांहून अधिक प्रवाशांची सुरक्षित वाहतूक केली जाते. या बसमधून दैनंदिन प्रवास करणारे कामगारवर्ग, विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना बसने प्रवास करताना अनेक समस्या उद्भवतात. त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने एसटी प्रशासनाकडून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
प्रवासी राजा दिनाचे वेळापत्रक पालघर विभाग नियंत्रक यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. परिवहन आगारात प्रवासी राजा दिन व कामगार पालक दिन साजरा करण्यात येणार आहे. या वेळेत संघटना व राज्य परिवहन कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बाबतीतील प्रश्न, रजा मंजुरी, कर्तव्य, वेळापत्रकासंबधी व कारवाईबाबत तक्रारी लेखी स्वरूपात घेऊन तक्रारीचे तत्काळ निराकरण करण्यात येणार असल्याचे विभाग नियंत्रक कैलास पाटील यांनी सांगितले आहे. प्रवासीवर्गाच्या समस्या सुटल्याने त्यांच्या शंकांचे समाधान होऊन प्रवासी सेवेचा दर्जा व गुणवत्ता वाढण्यास मदत होणार असल्याचे एसटी विभाग विभागाकडून सांगण्यात आले आहे.
वरिष्ठांना अहवाल देणार
प्रत्येक लेखी तक्रारीची नोंद ठेवण्यात येणार असून, याबाबत काय कार्यवाही केली आहे, यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार आहे. प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेऊन आपल्या समस्यांचे निराकरण करुन घ्यावे, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.
दुपारी २ वाजेपर्यंत मुदत
१० सप्टेंबरपासून सर्वत्र सुरू होणाऱ्या या अभिनव योजनेमध्ये प्रवासी, प्रवासी संघटना, शाळा-महाविद्यालये आपल्या समस्या-तक्रारी, सूचना लेखी स्वरूपात दर बुधवारी संबंधित आगारात सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मांडू शकतात. तसेच त्यानंतर त्याच दिवशी संबंधित आगारात दुपारी ३ ते ५ या वेळेत कामगार दिन साजरा करण्यात येणार आहे.
स्थानकातील प्रवाशांच्या समस्या
बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप नसतात, तसेच एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ होत नाहीत, ठरलेले थांबे अनेकदा घेतले जात नाहीत, चालक-वाहक यांची मुजोरी सामान्य नागरिकांना अनेकदा पहावी लागते, चालक-वाहक यांनी सौजन्याने वागावे अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त केली जाते. यासंबंधित प्रवाशी तक्रारींचे निराकरण वेळेत न झाल्याने प्रवाशांना गैरसोईचा सामना करावा लागतो. या समस्यांचे निराकरण स्थानिक पातळीवर तातडीने होण्यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे.
आगार - तारीख
अर्नाळा - १० सप्टेंबर व १२ नोव्हेंबर
बोईसर - १७ सप्टेंबर व ३ डिसेंबर
नालासोपारा - २४ सप्टेंबर व १० डिसेंबर
जव्हार - १ ऑक्टोबर व १० नोव्हेंबर
पालघर - १० ऑक्टोबर
सफाळे - १५ ऑक्टोबर
वसई - २९ ऑक्टोबर
डहाणू - २६ नोव्हेंबर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.