राज्यात २४ तास सेवा, १ लाख ६६ लोकांनी साधला संपर्कस, ठाणे, पुणे आणि अंबेजोगाई मानसिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधा
मानसिक आरोग्यासाठी टेलिमानस
राज्यात २४ तास सेवा; एक लाख ६६ लोकांनी साधला संपर्क
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : बदलती जीवनशैली, कामाचा ताण, झोपेची समस्या, स्पर्धा या सर्व गोष्टींमुळे मुंबईकरांचे जीवन तणावपूर्ण झाले आहे. हा तणाव, नैराश्य संवादातून कमी व्हावे, यासाठी राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने टेलिमानस ही टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली. राज्य सरकारच्या मानसिक आरोग्य कक्षातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, टेलिमानसच्या १,४४१६ या हेल्पलाइन क्रमांकावर आतापर्यंत एक लाख ६६ हजार १८७ लोकांनी संपर्क केला. दरदिवशी सरासरी ६० ते ७५ संपर्कांची नोंद या हेल्पलाइनवर केली जात आहे. ऑक्टोबर २०२२ पासून या टेलिमानस हेल्पलाइन क्रमांकाला सुरुवात झाली होती. गेल्या साडेतीन वर्षांत हेल्पलाइनवर कॉल्स येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढल्याचे जागतिक आत्महत्या प्रतिबंधदिनानिमित्त प्रकर्षाने जाणवत आहे. सर्वाधिक कॉल्स झोप न येणे, तणावग्रस्त वाटणे, निराश वाटणे, राग येण्याच्या कारणासाठी करत असल्याचे ही टेलिमानसमधून नमूद झाले आहे.
.........................
कोणत्या समस्येवर उपचार?
कुठलाही मानसिक तणाव
व्यसनाधीनता
नातेसंबंधांतील समस्या
स्मृतिसंबंधित समस्या
परीक्षेचा ताण
कौटुंबिक समस्या
आत्महत्येचे विचार
आर्थिक ताण
किंवा इतर कोणत्याही समस्या
२४ तास हेल्पलाइन
महाराष्ट्रात २४ तास टेलिमानस हेल्पलाइनद्वारे एकात्मिक आणि सर्वसमावेशक मानसिक आरोग्यसेवा दिली जाते. याअंतर्गत विविध मानसिक समस्यांसाठी समुपदेशन केले जाते. राज्यात तीन टेलिमानस युनिट आहेत. प्रादेशिक मनोरुग्णालय ठाणे, प्रादेशिक मनोरुग्णालय पुणे आणि वृद्धत्व आरोग्य व मानसिक आजार केंद्र अंबाजोगाई बीड व एक मॉनिटरिंग युनिट नागपूर येथे सुरू आहे. ११ जून २०२५ पर्यंत एक लाख ६६ हजार १८७ कॉल्स आले असून यापैकी सर्वांनाच फोनवर उपलब्ध झालेल्या मानसोपचार तज्ज्ञमंडळींनी समुपदेशन करत सल्ला व मार्गदर्शन केले आहे.
या कारणांनी नागरिक ग्रस्त
झोप न लागणे
भविष्यात आपले कसे होणार?
लग्नासंबंधित अडथळे त्यातून आलेले नैराश्य
काहीच न सूचणे
नैराश्य वाटणे
कशातच रस न वाटणे
मन न लागणे
एका वेळेस अनेक विचारांची गुंतागुंत
भीती
काळजी
नातेसंबंधी अडथळे
..................................
मानिसक आरोग्यासाठी पंचसूत्री
मानसिक आरोग्यासाठी पंचसूत्रीचा वापर केल्यास अधिक सकारात्मक वाढू शकते.
१) लोकांशी कनेक्ट व्हा- ज्यात चांगले संबंध निर्माण होणे गरजेचे आहे. आपलेपणा, स्वत:च्या मूल्याची भावना निर्माण करण्यास मदत होते.
२) सकारात्मक अनुभव शेअर करा- भावनिक आधार मिळतो.
३) शारीरिकदृष्ट्या सक्रिय व्हा- यामुळे स्वाभिमान वाढण्यास मदत होते. ध्येय किंवा आव्हाने निश्चित करण्यास मदत होते. मेंदूत रासायनिक बदल घडवून आणि स्वभावात सकारात्मक बदल करण्यास मदत होते.
४) नवीन कौशल्ये शिका- पाक कला शिकणे, निरोगी खाण्याच्या आणि स्वयंपाकाच्या टिप्सबद्दल जाणून घ्या, कामावर नवीन जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करा. इतरांना द्यायला शिका - दयाळूपणा या कृतींमुळे मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. सकारात्मक भावना आणि प्रतिफळाची भावना निर्माण करणे.
५) वर्तमान क्षणाकडे लक्ष द्या- सध्याच्या क्षणाकडे लक्ष दिल्यास मानसिक आरोग्य सुधारते. यात स्वतःचे विचार, भावना, शरीर आणि सभोवतालचे जग याचा समावेश आहे.
जनजागृतीची गरज
कोणत्याही भाषेचा व्यक्ती या हेल्पलाइन क्रमांकावर समस्येसाठी मोफत समुपदेशन किंवा सल्ला घेऊ शकतो. यातून सौम्य लक्षणांवर भर, भीती, काळजी, त्रास, तणाव, संशयित वाटणे, यातून सर्वात जास्त परिणाम व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर होतो. अनेक जिल्ह्यातून आम्हाला कॉल्स येत नाही तिथे ही आता या हेल्पलाइनची जनजागृती करण्याची गरज वाढली आहे.
समुपदेशनातून समस्या दूर
हेल्पलाइनद्वारे ८० टक्के मानसिक आरोग्याच्या समस्या समुपदेशनातून दूर होतात. सातपैकी एकाला तणाव किंवा डिप्रेशन वाटते. येणाऱ्या प्रत्येक कॉलला योग्य पद्धतीने सल्ला दिला जातो. प्रश्न विचारून मार्गदर्शन केले जाते, असे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. या टोल फ्री क्रमांकाच्या माध्यमातून क्लिनिकल सायकॉलॉजीस्ट, सायकीॲट्रिक नर्स आणि सायकीॲट्रिक सोशल वर्कर समुपदेशनाचे कार्य करीत असून या सेवेसाठी मनोविकृतितज्ज्ञदेखील नियुक्त आहेत. राज्याच्या टेलिमानस कार्यक्रमाच्या उपयोगीतेमध्ये देशात दुसरा क्रमांक आहे. मोठ्या प्रमाणात गरजू नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत, असेही वरिष्ठ अधिकारी सांगतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.