ठाण्यात मादी श्वानाला कारखाली चिरडले
ठाण्यात श्वानाला कारखाली चिरडले
चालकाविरोधात गुन्हा दाखल
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : चंपा नामक या मादी श्वानाला गाडी खाली चिरडल्याची घटना ठाण्यात समोर आली आहे. याप्रकरणी एका गृहिणीच्या तक्रारीनुसार वाहनचालकाविरोधात प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलमाप्रमाणे बुधवारी (ता. १०) पहाटे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार स्वाती सरोज (वय ४५) या गृहिणी असून त्या श्रीनगर, आयप्पा मंदिर परिसरात राहतात. त्यांच्या मुलीला प्राण्यांची आवड असल्याने त्या परिसरातील प्राण्यांना ती खायला घालते. मंगळवारी (ता. ९) रात्रीच्या सुमारास त्याच परिसरात राहणाऱ्या पूनम शहा (वय ५५) यांनी चंपा या श्वानाला आयप्पा सर्कलजवळ एका चारचाकीने चिरडल्याचे सांगितले. स्वाती आणि त्यांची मुलीने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता चंपाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. याचदरम्यान शहा यांनी संबंधित कार चालकाकडे बोट दाखवले. आणि मृत श्वानावर स्थानिकांच्या मदतीने त्याच परिसरात अंत्यविधी केले. त्यानंतर पोलिस ठाण्यात धाव घेत, कार चालक संतोष जोसेफ (वय ५२) यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुलझारीलाल फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.