घोडबंदरकरांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे हवेत दहा मिनिटे
घोडबंदरकरांना उपमुख्यमंत्र्यांचे हवेत दहा मिनिटे
वैतागलेल्या नागरिकांचे घोडबंदर मार्गावर शुक्रवारी आंदोलन
ठाणे शहर, ता. १० (बातमीदार) ः घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोंडीसह इतर समस्यांच्या निपटाऱ्यासाठी परिसरातील नागरिकांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वेळ आहे, मात्र वर्षभरापासून त्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने अखेर येथील रहिवाशांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. हे नागरिक (ता.१२) घोडबंदर मार्गावर बसून त्यांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवणार आहेत. घोडबंदर मार्गावरील जड-अवजड वाहनांची कोंडी कमी करण्याकरिता दोन ठिकाणी ट्रक टर्मिनल उभारतानाच या मार्गाच्या खड्डे दुरुस्तीसाठी तात्पुरता नव्हे तर कायमचा उपाय करावा, अशा त्यांच्या विविध मागण्या आहेत.
घोडबंदर महामार्ग आता महासंकटाचा मार्ग म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. या मार्गावरील कोंडीचा परिणाम केवळ ठाण्यालाच जाणवत नसून तो थेट पालघर, वसई, गुजरात यांना देखील जाणवत आहे. या मार्गाचे रुंदीकरण सुरू असून त्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात त्रुट्या निर्माण झाल्या आहेत. परिसरातील रहिवाशांनी महामार्गाकरिता दिलेल्या जागा असतानाही सर्वात जास्त फटका त्यांनाच बसत आहे. हा मार्ग घोडबंदर परिसरातील लोकांकरिता जीवघेणा ठरत आहे, असा आरोप जस्टीस फॉर घोडबंदर रोड या ग्रुपमधील सदस्यांनी केला. तर, शुक्रवारी (ता.१२) सकाळी नऊ वाजता रस्त्याकडेला शांततेत सरकार आणि प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.
शिंदे वेळ देत नाहीत
घोडबंदर रोडवरील कामामुळे भविष्यात उद्भवणाऱ्या मोठ्या संकटांचा सामना करावा लागणार असल्यामुळे याची माहिती देण्याकरता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांचा वेळ देत नाहीत. वर्षभरापासून आमच्या ग्रुप त्यांची अवघी ५-१० मिनिटांची वेळ घेण्याकरिता प्रयत्न करत असून ती मिळत नसल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागला असल्याचे ग्रुपचे सदस्य गिरीश पाटील यांनी सांगितले.
मागण्या
जड वाहनांच्या वेळापत्रकाचे काटेकोर पालन करावे, खड्ड्यांची दुरुस्ती तात्पुरती न करता त्यावर कायमस्वरूपी उपाय करावा, गायमुख घाटाचा प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावावा, वर्सोवा चौकाजवळ एक आणि मुंबई नाशिक महामार्गावर कारेगाव टोल नाका परिसरात एक अशा दोन ट्रक टर्मिनलची उभारणी करावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.