विषारी वायूंमुळे रहिवाशी त्रस्त
विषारी वायूंमुळे रहिवासी त्रस्त
चेंबूरमधील कारखान्यातून प्रदूषण : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जीवन तांबे
चेंबूर, ता. १० : चेंबूर येथील आरसीएफ कंपनी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना गेल्या दोन दिवसांपासून डोळे, त्वचा जळजळणे व मळमळ यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. अशा वाढत्या प्रदूषणामुळे रहिवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाशीनाका, माहूल गाव, टाटा पॉवर बीपीसीएल, आरसीएफसारख्या रिफायनरी व रासायनिक कंपन्या आहेत. या रासायनिक कंपन्यांमधून सतत विषारी वायू हवेत मिसळत असतात. त्यामुळे रहिवाशांचे डोळे लाल होणे, केस गळणे, त्वचा काळी पडणे, बुरशीजन्य संसर्ग, दमा, त्वचा काळी पडणे यासारख्या आजारांना आजही बळी पडावे लागत आहे. चेंबूर, माहूल गावाप्रमाणे मानखुर्द, गोवंडी, ट्रॉम्बे व वडाळा परिसरातील रहिवासीही या प्रदूषणाच्या विळख्यात अडकलेले आहेत.
चेंबूर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून रहिवाशांना डोळे लाल होणे, त्वचेला जळजळ होणे, श्वसन आजाराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रहिवाशांना आपल्या घराच्या खिडक्या ओल्या टॉवेलने बंद व थंड पाण्याने डोळे धुण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे त्रस्त रहिवाशांनी वायूगळतीबाबत व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर टाकले आहेत, तर काहींनी वारंवार होणाऱ्या त्रासाबद्दलच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या आहेत. चेंबूर परिसरातील रासायनिक कंपनी तसेच आरसीएफ कंपनी सोडत असलेल्या विषारी वायूमुळेच आमच्या डोळ्याची जळजळ, त्वचेला खाज सुटणे व दमा यासारख्या समस्या उद्भवत असल्याने आरसीएफ प्लांटमधून वायूगळतीबाबत कित्येक तक्रार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व अग्निशमन दलाकडे केल्या होत्या.
संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली; मात्र आरसीएफ कारखान्यात अमोनिया गळतीची कोणतीही घटना घडलेली नाही. आरसीएफ कंपनीच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अफवेचे खंडन केले. चेंबूर परिसरातील रासायनिक व रिफायनरी कंपनीच्या विषारी प्रदूषणामुळे आतापर्यंत १०० पेक्षा अधिक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे.
न्यायालयाचे आदेश
न्यायालयाने या प्रदूषित परिसरातील रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. कामगार संरक्षण संघटनेचे अध्यक्ष बिल्लाल खान यांनी रासायनिक कंपन्यांचे स्थलांतर कमी लोकवस्तीच्या भागात करण्याची मागणी केली आहे.
समाजमाध्यमांवर संताप
रहिवाशांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर प्रसारित करीत आपली व्यथा मांडली आहे. काहींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारीदेखील केल्या आहेत; तरीही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.
माहूल परिसरात प्रदूषण आहे. त्याचा परिणाम लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिलांवर मोठ्या प्रमाणात होत आहे. दमा व त्वचेवर लक्षणे दिसली की लगेच डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
- डॉ. महादेव गराळे, केईएम व झेन रुग्णालय
गेल्या कित्येक दिवसांपासून वातावरण दूषित आहे. प्रदूषणामुळे खोकला, त्वचा व डोळ्याची जळजळ होत आहे. मुंबईत आलो आहे. आता दुसऱ्या विभागात घर घेता येत नसल्याने नाइलाजाने चेंबूर परिसरात राहावे लागत आहे.
- अहमद मालिम, ज्येष्ठ नागरिक
हलाखीची परिस्थिती असल्याने या परिसरात राहावे लागत आहे. घरात सर्वजण सतत आजारी पडत असतात.
- भीमराव सव्वाखंडे, स्थानिक रहिवासी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.