गणपतीला गावी जाणे आजीबाईंना पडले महागात ; सोन्याचे दागिने गेले चोरीला
गणपतीला गावी जाणे आजीबाईंना पडले महागात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता.१० : गणपतीला सिंधुदुर्ग येथे गावी निघालेल्या भांडुपच्या ६३ वर्षीय आजीबाईंना चांगलेच महागात पडले आहे. प्रवासात चोरट्याने लांबवल्याची बाब पुढे आली आहे. याप्रकरणी गावाला जाऊन आल्यानंतर मंगळवारी (ता. ९) आजीबाईंनी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे.
भांडुप येथे राहणाऱ्या आजीबाईंचे नाव भारती मर्गज आहे. त्या १ सप्टेंबर रोजी कुटुंबासह गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग येथे गावी निघाल्या होत्या. जनशताब्दी एक्सप्रेसने गावी जाण्यासाठी सुमारे साडेपाच वाजता त्या पती- मुलासह ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक सातवर आल्या होत्या. गाडीत चढल्यावर त्यांनी खांद्यावरील पर्स पाहिल्यास रुमालात बांधून ठेवलेले सोन्याचे दागिने मिळून आले नाही. दरम्यान त्यांच्या पतीने आणि मुलाने डब्याच्या आजूबाजू शोध घेतला असता दागिने मिळून आले नाही. यामध्ये १५ हजार ८७ रुपये किमतीचे ३४.२९० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, दोन हजार १९९ रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची सोन्याचे अंगठी आणि ८७९ रुपयाची दोन ग्रॅम वजनाची नाकातील नथ असा १८ हजार १६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अर्चना दुसाने यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.