घरगुती गणेशोत्सवातून जपली सामाजिक बांधिलकी
घरगुती गणेशोत्सवातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत
कल्याण, ता. १० (वार्ताहर) : डोंबिवली जवळील काटई गावातील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील गणेशोत्सवातून सामाजिक बांधिलकी ही संकल्पना राबवली. गजानन पाटील यांनी गणेश भक्तांना दर्शनाला येताना कोणत्याही प्रकारे हार, फूल, मिठाई न आणता शैक्षणिक साहित्य अर्पण करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला गणेश भक्तांकडून प्रतिसाद मिळला आहे. हे शैक्षणिक साहित्याचे वाटप मंगळवारी (ता. ९) जिल्हा परिषद शाळा कासणे आणि खाणीवली, बामणे, खैरपाडा या चार गावातील एकूण २५० आदिवासी समाजातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. हे शैक्षणिक साहित्य वाटपापूर्वी आगरी समाजातील प्रसिद्ध निवेदक तथा जादूगर राम पाटील यांचे जादूचे प्रयोग सुद्धा झाले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांच्यासोबत हभप हनुमान पाटील, हभप महेश संते, जे. के. पाटील शाळेचे संचालक गजानन पाटील, माजी उपसरपंच फुलचंद पाटील, माजी सरपंच गिरीधर पाटील, जादूगर राम पाटील, कर्सन पाटील, गणेश पाटील, मंगेश खुटाकर, शशी पाटील, सुनिल पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, युवराज पाटील उपस्थित होते. शैक्षणिक साहित्य वाटपाकरिता कासणे शाळेचे मुख्याध्यापक मनोहर मडके यांच्यासह कासणे ग्रामपंचायत माजी सरपंच विद्यमान सदस्य भावना भोईर व भगवान भोईर, खैरपाडा शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली बागुल व खानिवली शाळेच्या मुख्याध्यापिका घायवट यांचे सहकार्य लाभले.