प्रभाग रचनेत पक्षपात
प्रभागरचनेत पक्षपात
जितेंद्र आव्हाडांचा आरोप; सुनावणीत विरोधक आक्रमक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या प्रारूप प्रभागरचनेवर मोठा वाद सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी या प्रभागरचनेवर जोरदार टीका केली आहे. आव्हाड म्हणाले, ही प्रभागरचना पूर्णपणे पारदर्शक आणि निष्पक्ष नसून एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या फायद्यासाठी तयार केली गेली आहे. त्यानुसार ही प्रभागरचना व्होट चोरीपेक्षाही भयंकर आहे. तसेच ही प्रारूप प्रभागरचना ही एक राजकीय पक्षाच्या सोयीसाठी असून नगरसेवक चोरी करण्यासाठी ही प्रभागरचना असल्याची टीकादेखील आव्हाड यांनी केली.
पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध केली होती. या प्रभागरचनेवर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार हरकती स्वीकारण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत २७० हरकती पालिका प्रशासंकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार बुधवारी (ता. १०) पालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात हरकतींवरील सुनावणी प्रक्रिया पार पडली. या वेळी प्राधिकृत अधिकारी राज्याचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांच्यासह पालिका आयुक्त सौरभ राव उपस्थितीत सुनावणी पार पडली. सुनावणीच्या सुरुवातीलाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेत प्रभागरचनेविरोधात गंभीर आरोप केले.
प्रभागरचना २०११ मध्ये झालेल्या जनगणनेच्या आधारावर केली जात असल्याचे जाहीर केले आहे. प्रभागरचनेचा जो मसुदा प्रसिद्ध करण्यात आला त्यामध्ये प्रभागाची लोकसंख्या दर्शविण्यात आली. मसुद्यात प्रगणक गट यांचे नकाशे आणि प्रती प्रगणक गट लोकसंख्या, त्यातील अनुसूचित जाती व जमातींची लोकसंख्या ही मूलभूत माहिती प्रसिद्ध केली नाही. यामुळे महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या मसुद्यांमधील लोकसंख्येचा कोणताही पडताळा घेता आला नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे विचाराणा करूनही ही माहिती प्राप्त झाली नसल्याचा आरोपदेखील आमदार आव्हाड यांनी या वेळी केला. एकूण नगरसेवकपद संख्येनुसार प्रतीनगरसेवक लोकसंख्या ठरविली जाते. सामान्यत: चार नगरसेवकांचा एक प्रभाग व आवश्यकता भासल्यास तीन किंवा पाच नगरसेवकांचा एक प्रभाग अशी प्रभागरचना करणे अपेक्षित आहे. २०१७ प्रमाणे प्रभागरचना असेल, असा दावा केला होता; परंतु हद्द आणि सीमा बदलल्या असून वॉर्डदेखील फोडल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला.
दरम्यान, प्रभागरचना ही अधिकाऱ्यांनी हॉटलमध्ये बसून केल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला. कोलशेतमध्ये वरचा गाव, खालचा गाव वेगळा केला गेला आहे. कोळीवाडा, कोकणीपाडा, वृंदावन तलावपाळीला आणि तलावपाळी खोपटला जोडण्यात आला आहे. आदींसह इतर भागांचेदेखील अशाच पद्धतीने तुकडे करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या तक्रारी कोणत्या प्रभाग समितीमध्ये जाऊन सोडवाव्यात, असा सवालही त्यांनी या वेळी उपस्थित केला.
कळवा, मुंब्र्यातील एक प्रभाग चोरला
प्रत्येक प्रभागाची लोकसंख्या ठरविताना सरासरी लोकसंख्येच्या १० टक्के जास्तपर्यंत किंवा १० टक्के कमीपर्यंत इतकी लोकसंख्या कमी-जास्त करता येते. ठाणे महानगरपालिकेची प्रती चार सदस्य प्रभाग सरासरी लोकसंख्या ५६,२२८ आणि प्रती तीन सदस्य सरासरी लोकसंख्या ४२.१७१ इतकी आहे. १० टक्के जास्त व १० टक्के कमी असा एकूण २० टक्के लोकसंख्या फरकाचा गैरफायदा घेऊन ठाणे शहर क्षेत्र व दिवा क्षेत्र येथे कमी लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले आणि कळवा-मुंब्रा क्षेत्रात जास्त लोकसंख्येचे प्रभाग बनविण्यात आले आहेत. या प्रकारे कळवा, मुंब्रा क्षेत्रात चार सदस्यांचा पूर्ण एक प्रभाग चोरल्याचा आरोप त्यांनी केला.
दिशा नाही, हद्द नाही : विक्रांत चव्हाण
प्रारूप प्रभागरचना सुनावणीदरम्यान, काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण हेदेखील आक्रमक झाल्याचे दिसून आले. महापालिकेने सादर केलेल्या प्रभागरचनेच्या नकाशांमध्ये हद्द दिसत नाही, सीमा चुकविण्यात आल्या आहेत. चुकीच्या पद्धतीने वॉर्ड फोडले गेले आहेत. सोयीचे वॉर्ड तयार करण्यात आले आहेत, असा आरोप या वेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी उपस्थित केला.