देवकान्हे-खांब मार्गावरील रूंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर,

देवकान्हे-खांब मार्गावरील रूंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर,

Published on

देवकान्हे-खांब मार्गावरील रूंदीकरणाचा प्रश्न ऐरणीवर,
अरुंद रस्त्यावर रोजची कोंडी; वाहनचालकासह प्रवासी हैराण
रोहा, ता. १३ (बातमीदार) : तालुक्यातील देवकान्हे ते खांब दरम्यानच्या रस्त्यावर रोजच वाहतूक कोंडी होत असल्याने वाहनचालक आणि प्रवासीवर्ग अक्षरशः हैराण झाला आहे. खांब-उडदवणे रस्त्यातंर्गत मोडणारा हा मार्ग अत्यंत अरुंद असल्याने, जेमतेम एकच वाहन एकावेळी मार्गक्रमण करू शकते. नवख्या वाहनचालकांना या रस्त्याची अरुंद रचना लक्षात न आल्यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाण अधिक वाढते.
या मार्गाचे मागील वर्षी डांबरीकरण करण्यात आले असले तरी, त्याचे रूंदीकरण होऊ शकले नाही. स्थानिक पातळीवर काही व्यक्तींनी यासाठी पुरेसे स्वारस्य न दाखविल्याने हा प्रकल्प अडथळ्यात सापडला. परिणामी, रस्ता मजबूत व पक्का झाला तरी अरुंदपणाची समस्या सुटलेली नाही. विशेष म्हणजे देवकान्हे ते चिल्हे या भागात डांबरीकरणाच्या वेळी रस्त्याची उंची वाढविण्यात आली; मात्र साईडपट्टीला भराव न केल्याने व तिची उंची न वाढवल्याने वाहन चालविताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. अलीकडे झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या अनेक भागातील साईडपट्टी वाहून गेली आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेला रस्ता अधिकच निमूळता झाला असून, वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वाहनचालकांना आपले वाहन नियंत्रित ठेवणे कठीण झाले आहे. काही ठिकाणी तर दोन वाहने समोरासमोर आल्यास एकास मागे घ्यावे लागते किंवा दीर्घकाळ थांबावे लागते. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली. गावोगावी होणाऱ्या विसर्जन मिरवणुका व उत्सवाच्या गर्दीमुळे दिवसातून अनेकवेळा वाहतूक कोंडीचे चित्र दिसून आले. यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जात असून, रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन सेवा या मार्गावरून गेल्यास परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते.

Marathi News Esakal
www.esakal.com