मोकळे असलेले गाळे बिगरगाळे धारकांना वाटप करा
मोकळे असलेले गाळे बिगर गाळेधारकांना वाटप करा
बाजारातील व्यापाऱ्यांची बाजार समितीकडे मागणी
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) ः वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनेक व्यापारी आजही आपल्या स्वतःच्या गाळ्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तर दुसरीकडे बाजारात काही गाळे आजही रिकामे आहेत. त्यामुळे शिल्लक राहिलेले हे रिकामे गाळे आणि नव्याने उभारलेल्या बहुउद्देशीय इमारतीमधील गाळ्यांचे अशा बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांना वाटप करण्यात यावे, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या संघटनेने केली आहे.
१९८०च्या सुमारास मुंबईमधून नवी मुंबईमध्ये बाजार समिती स्थलांतरित करण्यात आली. या वेळी अनेक व्यापाऱ्यांना गाळेवाटप करण्यात आले. त्यानंतर काही व्यापाऱ्यांना गाळेवाटप करणे शक्य झाले नाही. त्यांना ओपनशेड उभारून व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली. भविष्यात अशा व्यापाऱ्यांना गाळेवाटप केले जाईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले होते. त्यानंतर फळ बाजारातील ओपन शेडच्या जागेवर आता बहुउद्देशीय इमारत उभारण्यात आली आहे; मात्र तिथल्या गाळ्यांचे अद्याप वाटप झालेले नाही. तर फळ बाजारात बाजार समितीचे १९ गाळे रिकामे पडले आहेत. त्यामुळे बाजार समितीने हे रिकामे गाळे बिगर गाळाधारक व्यापाऱ्यांना वाटप करावे. शिवाय, बहुउद्देशीय इमारतीमधील ३३ गाळ्यांची व्यापाऱ्यांमध्ये वाटणी करावी, अशी मागणी बोरिवली फळ आणि भाजीविक्रेता मंडळाने बाजार समिती प्रशासनाकडे केली आहे. गेली अनेक वर्षे हे व्यापारी बिगरगाळा व्यापार करीत आहेत. गाळा नसल्याने ऊन- पावसात सर्व त्रास सहन करीत हे व्यापारी आपला व्यवसाय करीत आहेत. कधी तरी आपल्याला गाळे मिळतील, या आशेवर ते व्यवसाय करीत आहेत; मात्र गाळे रिकामे असूनही त्यांना त्याचे वाटप केले जात नसल्याने व्यापाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
..............................
चौकट
बाजार समितीचे स्थलांतर झाल्यापासून आम्ही या ठिकाणी बिगरगाळा व्यापार करीत आहोत. आता गाळे रिकामे असताना त्यांचे व्यापाऱ्यांना वाटप होणे गरजेचे आहे; मात्र बाजार समितीकडून असे काही होत नाही. यासाठी आम्ही वारंवार बाजार समितीकडे मागणी करीत आहोत, असे व्यापारी रामबशिष्ठ जयस्वाल यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.