ठाण्याची आरोग्य सेवा होणार अधिक बळकट
ठाण्याची आरोग्यसेवा होणार अधिक बळकट
१० आयुष्मान आरोग्य केंद्रांचा ११ सप्टेंबरला शुभारंभ
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ९ : ठाणे महापलिका क्षेत्रातील आरोग्यसेवा अधिक बळकट व्हावी, यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहे. त्यानुसार पालिका क्षेत्रात ६८ ठिकाणी नव्याने आयुष्मान आरोग्य मंदिर सुरू करणार आहे. पहिल्या टप्प्यात १० ठिकाणी हे केंद्र उभारण्यात येणार असून, त्याचा शुभारंभ ११ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे.
गोरगरीब नागरिकांसाठी पालिकेचे छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय वरदान ठरत आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्यसेवेसाठी ३३ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सहा प्रसूतिगृह कार्यरत आहेत. असे असताना, दुसरीकडे केंद्र सरकारमार्फत महापालिका हद्दीत २०२१-२२ या कालावधीत १२ व २०२२-२३ या कालावधीत ५६ असे एकूण ६८ नागरी आयुष्मान आरोग्य मंदिर मंजूर झाले आहेत. त्यासाठी महापालिकेच्या मालकीच्या ५१ जागा उपलब्ध झाल्या असून १० केंद्रे यापूर्वीच सुरू झाली आहेत, तर ५१ पैकी ३० जागांवर आता पोर्टा कॅबीनच्या माध्यमातून हे दवाखाने सुरू केले जाणार आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने काढलेल्या निविदेला प्रतिसाद मिळाल्याने आता येत्या ११ सप्टेंबर रोजी १० ठिकाणी आरोग्य मंदिर सुरू होणार आहे.
‘या’ ३० ठिकाणी सुरू होणार
ठाणे पालिकेच्या मध्यातून सुरुवातीला ३० ठिकाणी आरोग्य मंदिर पोर्टा कॅबिनमध्ये सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये वर्तक नगर-समता नगर, धर्मवीर नगर, क्रिष्णा नगर, कोकणीपाडा, नौपाडा कोपरी-शाळा क्रमांक ३४ कोपरी पूर्व, आनंद दिघे सभागृहाजवळ, गांधी नगर, लोकमान्य सावरकर नगर-लोकमान्य पाडा नं. २, बाल स्नेहालय इमारत समोरील मैदान, शास्त्री नगर, कळवा-कळवा गावदेवी मैदान जवळ, आनंद विहार सोसायटी लगत, महात्मा फुले नगर, वागळे-दालमिल नाका, किसन नगर, मुंब्रा-घासवाल कंपाऊंड, दारुल फलाह गार्डन, संतोष नगर, रेती बंदर, अमिनाबाद एसटीपी प्लॉट, उथळसर-आझादनगर १, राबोडी नं. २, बाटा कंपाउंड, गोदावरी रेंटर इमारतीसमोर दिवा-काळसेकर हॉस्पीटल मागील भुखंड, भारत गिअर कंपनी समोर, फडकेपाडा, माजिवडा मानपाडा-गायमुख रेती बंदर, वाघबीळ गाव, कापुरबावडी नाका.