थोडक्यात रायगड बातम्या
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत प्रशिक्षण
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) ः धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ८ ते १० सप्टेंबरदरम्यान तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्ससाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था, रामनिधी खोपोली येथे करण्यात आले. या प्रशिक्षणाचे उद्घाटन मंगळवारी (ता. ९) जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, तहसीलदार कर्जत डॉ. धनंजय जाधव, गटविकास अधिकारी संदीप कराड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, पेण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे हे मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी जिल्हाधिकारी जावळे यांनी प्रशिक्षणार्थींना संबोधित करताना सांगितले, की रायगड जिल्ह्यातील ११३ आदिवासी वाड्यांमध्ये सर्वसमावेशक योजना राबवून वाड्यांचा समृद्ध विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी त्यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आणि मास्टर ट्रेनर्सना आवश्यक त्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी स्वतः प्रत्येक तालुक्यातील दोन वाड्यांना भेट देऊन ग्रामविकास आराखड्यांचा आढावा घेणार असून, सर्व ११३ वाड्यांचे आराखडे स्वतः तपासून शासनाकडे सादर करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. या तीनदिवसीय प्रशिक्षणामध्ये तालुकास्तरावरील ७१ मास्टर ट्रेनर्सना जनजातीय गावांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक कौशल्य व माहिती प्रदान करण्यात आली. प्रशिक्षणामध्ये विविध योजना, समुदाय संवाद, ग्रामविकास आराखडा निर्मिती आणि नेतृत्व क्षमता या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांच्या शाश्वत आणि समावेशी विकासासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले असून या उपक्रमामुळे स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग वाढून, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होणार आहे.
..................
सेवानिवृत्त संघटनेकडून शिक्षकांचा सन्मान
रोहा (बातमीदार) ः शिक्षकदिनाचे औचित्य साधून शासकीय- निमशासकीय सेवानिवृत्त संघटनेकडून रोह्यातील माध्यमिक व प्राथमिक सेवानिवृत्त शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. मारुती राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सेवानिवृत्त संघटनेची सभा झाली. या वेळी ज्येष्ठ नागरिक मंडळाचे अध्यक्ष पी. बी. सरफळे, एस. एन. गायकवाड, उपाध्यक्ष सुरेश मोरे, शरद गुडेकर, एम. डी. भोईर, भगवान, बामुगडे, भादेकर, जाधव, माधुरी डफळ, सचिव एन. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत २० शिक्षकांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच सप्टेंबर महिन्यात ज्यांचा वाढदिवस आहे. त्या मंडळींचा वाढदिवसदेखील साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. १३ सप्टेंबर २०२५ रोजी पोलादपूर येथे होणार असलेल्या वार्षिक सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले. पी. बी. सरफळे, मारुती राऊत, एस. एन. गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.
.................
अलिबाग समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम
अलिबाग, ता. ११ (वार्ताहर) : अलिबाग नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचिन बच्छाव आणि द लाइफ फाउंडेशनच्या सहसंस्थापक व व्यवस्थापकीय विश्वस्त पूनम अजित लालवानी यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि. ९) सकाळी अलिबाग समुद्रकिनाऱ्यावर गणेश विसर्जनानंतरची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमात अलिबाग नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छता कर्मचारी, नगर परिषदेचे अधिकारी व द लाइफ फाउंडेशनच्या स्वयंसेवकांसह एकूण ५४ जणांनी सहभाग घेतला. तसेच समुद्रकिनाऱ्यावरील कचरा व अवशेष दूर करून किनाऱ्याचे नैसर्गिक सौंदर्य पुन्हा खुलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. समाज म्हणून एकत्र येऊन आपण जबाबदारीला कृतीत रूपांतरित करू शकतो आणि त्यामुळे आपले समुद्रकिनारे स्वच्छ, निरोगी व सुरक्षित होऊ शकतात, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी अलिबाग नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक धनंजय आंब्रे, सहाय्यक नगररचनाकार सौरभ खरात, पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता प्रियांका मोरे, शहर समन्वयक आर्या जाधव, तसेच द लाइफ फाउंडेशनचे कार्यक्रम व्यवस्थापक शिलानंद इंगळे, सोशल वर्कर प्रणय ओव्हाळ व राखी राणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
...............
पेणच्या श्रीसदस्यांकडून सात टन निर्माल्य गोळा
निर्माल्यापासून खतनिर्मिती
पेण (वार्ताहर) : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या आदेशावरून पेण शहरासह तालुक्यातील गणेश विसर्जन ठिकाणाहून जवळपास सात टन निर्माल्य गोळा करण्यात आला असून या निर्माल्यापासून खतनिर्मिती केली जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आजतागायत वृक्षारोपण व संगोपन, स्वच्छता अभियान, आरोग्य तपासणी शिबिर, प्रौढ साक्षरता वर्ग, तलावातील गाळ काढणे, विहीर पुनर्भरण यासह असंख्य विविध सामाजिक कार्य या प्रतिष्ठानच्या वतीने श्रीसदस्य करीत आले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या गणेश विसर्जनाच्या वेळी भक्तांनी निर्माल्य तलाव अथवा नदीत सोडण्यात आल्याने पाणी प्रदूषण टाळण्यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने सर्व निर्माल्य गोळा करून त्याच्यापासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम मागील काही वर्षांपासून हाती घेण्यात आला आहे. या वर्षी पेण शहर व तालुक्यात दीड दिवसांचे एक हजार ९७६, पाच दिवसांचे गौरी-गणपती चार हजार ८०९ तर अनंत चतुर्दशीदिवशी ८४४ गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आल्या आहेत. यादरम्यान डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या वतीने सदस्यांनी पेण शहर व तालुक्यातून जवळपास सात टनाच्या वर निर्माल्य गोळा करण्यात आले आहे. याकरिता पेण शहरातील विविध ठिकाणी तसेच तालुक्यातील वाशी नाका, वाशी, रावे, वरवणे, वरसई, सापोली, धावटे, आंबिवली, जिते, हनुमान पाडा, दादर, शिर्की, वडखळ, भाल या गावाच्या अंतर्गत बैठकांतील ८७७ श्रीसदस्य या मोहिमेत सहभाग घेतला.
.............
मुरूड बाजारपेठेत साखरचौथ गणेशाचे आगमन
मुरूड (बातमीदार) ः मुरूड बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने जल्लोषात साखरचौथ गणरायाचे आगमन ढोल-ताशांच्या निनादात आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात झाले. या वेळी बाजारपेठेतील शेकडो गणेशभक्त या मानाच्या गणपतीच्या आगमनात उत्साहाने सहभागी झाले होते. बाजारपेठेमध्ये धूम सुरू असून भक्तांची गर्दी पाहायला मिळाली. या वर्षी पूजेचे मानकरी नरेंद्रसिंह कछवाह यांनी सपत्निक विधिवत पूजन केले. तर पौरोहित्य समीर उपाध्ये यांनी केले. या वेळी मुरूड बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने सुश्राव्य भजन संध्येचा कार्यक्रम होणार असून दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
................