प्रभाग रचनेवरून वादंग

प्रभाग रचनेवरून वादंग

Published on

प्रभागरचनेवरून वादंग
१४ गावांच्या समावेशावरून सुनावणीत आक्षेप
तुर्भे, ता. ११ (बातमीदार): नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी १४ गावांसहित प्रारूप प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या प्रभागरचनेवरील हरकतींवर वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात गुरुवारी सुनावणी पार पडली. या वेळी माजी लोकप्रतिनिधींनी १४ गावांच्या नवी मुंबई पालिकेतील समावेशावर आक्षेप घेण्यात आल्याने प्रभागरचनेच्या प्रक्रियेवरून नवा वाद उद्भवला आहे.
कल्याण तालुक्यातील १४ गावे नवी मुंबई शहरात समावेश करण्याबाबत मार्च २०२२मध्ये नगरविकास खात्याने निर्णय घेतला होता. नवी मुंबईत १४ गावांच्या समावेशाबाबत सप्टेंबर २०२२मध्ये हरकत-सूचनांकरिता शासनाने जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर महिनाभराचा अवधी दिला होता. या कालावधीत नवी मुंबई शहरातून किंवा ठाणे जिल्ह्यातून एकही हरकत नोंदवली गेली नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी १४ गावांना नवी मुंबई महापालिका हद्दीत समाविष्ट करणारी अंतिम अधिसूचना शासनाने जारी केली. अशातच नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी चारसदस्यीय प्रारूप प्रभागरचना २२ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावर हरकती-सूचना मागवल्या होत्या. या हरकतींवर वाशीतील विष्णूदास भावे नाट्यगृहात सुनावणी पार पडली. या वेळी माजी लोकप्रतिनिधींनी प्रभागरचनेत १४ गावे समाविष्ट केल्याबाबत आक्षेप नोंदवला. मात्र सप्टेंबर २०२२मध्ये हरकत सूचना मागवल्या होत्या. त्या वेळी चुप्पी साधणाऱ्या लोकप्रतिनिधींना आता आक्षेप घेतल्याने त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आहे.
-------------------------
महामार्ग ओलांडून मतदान अशक्य
माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी नुकत्याच झालेल्या नवीन प्रभागरचनेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधून घेतले आहे. नव्या बदलामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि मतदान प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. जुना प्रभाग क्रमांक १५ हा महामार्गाच्या उत्तरेकडे होता. मात्र नव्या रचनेनुसार प्रभाग क्रमांक ५ हा दोन्ही बाजूंवर विस्तारला असून, त्यात सेक्टर १४, १५, ११, १२, १३ आणि १८चा काही भाग जोडण्यात आला आहे. भौगोलिक सलगता आणि नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने पाहता हा उत्तर भाग प्रभाग क्रमांक ४मध्ये जोडणे अधिक योग्य ठरले असते. परंतु नैसर्गिक अडथळ्याकडे दुर्लक्ष करून प्रभाग ५मध्ये हा भाग समाविष्ट केल्याचे पाटील यांनी सांगितले.
------------------------------------
नवी मुंबई पालिकेच्या निवडणुकीकरिता प्रभागरचना २०११च्या जनगणनेवर आधारित आहे. तेव्हा ही गावे नवी मुंबईत समाविष्ट नव्हती. त्यामुळे आता प्रभागरचनेत जुन्या प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे १४ गावांसाठी एका स्वतंत्र प्रभागाची रचना करायला हवी.
- सुधाकर सोनवणे, माजी महापौर, नवी मुंबई महापालिका
------------------------------------
नवी मुंबईतील जुने प्रभाग तोडले असून, प्रभागरचनेचे निकष डावलले गेले आहेत. ही गावे नवी मुंबईत समाविष्ट केल्यास त्याच्या खर्चाचा भार नवी मुंबई शहरावर पडणार आहे. त्यामुळे ही गावे नवी मुंबईत समावेश करण्याबाबत आमचा आक्षेप आहे.
- अमित मेढकर, माजी नगरसेवक, नवी मुंबई महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com