पनवेलमध्ये धावणार पालिकेची बस

पनवेलमध्ये धावणार पालिकेची बस

Published on

पनवेलमध्ये धावणार पालिकेची बस
सर्वेक्षणासाठी एजन्सी नेमण्याची प्रक्रिया सुरू
पनवेल, ता. ११ (बातमीदार)ः पनवेल महापालिकेची स्वतःची बससेवा असावी, असा प्रस्ताव आहे, मात्र त्याची प्रत्यक्ष चाचपणी सुरू झाली आहे. याकरिता एक एजन्सी नियुक्त करण्यात येणार असून, सर्वेक्षणाअंती येणाऱ्या अहवालानुसार पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
दक्षिण नवी मुंबई असणाऱ्या पनवेलचा झपाट्याने विकास झाला आहे. नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा, नावडे, करंजाडे, उलवे या ठिकाणची लोकवस्ती वाढलेली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळात विस्थापित झालेल्यांना मिळालेल्या जागेत पुष्पक नगर विकसित होत आहे. या व्यतिरिक्त पनवेल बाहेर नेरे, पळस्पे, पोयंजे येथेही नैना क्षेत्राचा विस्तार होत आहे. सध्या पनवेल परिसरात नवी मुंबई महापालिकेच्या बस येतात. मोठ्या प्रमाणात फेऱ्या रेल्वेस्थानक आजूबाजूच्या भागात होत आहेत. याव्यतिरिक्त बेस्टच्या बसही येतात. तसेच एसटी महामंडळाच्या सेवेवरही अवलंबून राहावे लागते. या सर्व गोष्टीमुळे पनवेल महापालिकेची स्वतंत्र बससेवा असावी, असा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षांपासून आहे.
----------------------------------------
अहवालानंतर पुढील धोरण
परिवहन क्षेत्रामधील अनुभवी आणि नामांकित कंपनीला सर्वेक्षणाचे काम दिले जाणार आहे. संबंधित एजन्सी तांत्रिकदृष्ट्या अभ्यास करून सर्वेक्षण करणार आहे. या ठिकाणी बससेवा सुरू केल्यानंतर किती प्रवासी भेटू शकतील. खरोखर आवश्यकता आहे का. त्याचबरोबर बससेवा फायद्यात राहील का तसेच बसचा मार्ग, प्रवाशांना त्याचा किती फायदा होईल या सर्व गोष्टींचा अभ्यास करणार आहे.
----------------------------------------
स्वस्त, सुखकर प्रवास
पनवेल महापालिकेने बससेवा सुरू केल्यानंतर पनवेलकरांना मोठ्या प्रमाणात रिंग रोड बससेवा उपलब्ध होणार आहे. अत्यंत कमी पैशांमध्ये अंतर्गत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यानुसार पनवेल मनपाकडून तयारी सुरू आहे.
-----------------------------
पनवेल महापालिकेच्या परिवहन सेवाबाबत एजन्सी नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात कार्यवाही सुरू झाली आहे. यामध्ये एकूण आर्थिक स्थिती, त्याचबरोबर अनुकूल आणि प्रतिकूल मुद्दे तपासले जाणार आहेत. त्यांच्या अहवालानंतर मग एनएमएमटी सोबत सेवा सुरू करायची का किंवा स्वतंत्र परिवहन व्यवस्था करणे, बसचा मार्ग याबाबतचे निर्णय घेण्यात येतील.
- अभिषेक पराडकर, उपायुक्त, पनवेल पालिका परिवहन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com