हिरव्या गालीच्यावर रंगीबेरंगी फुलांची नक्षी
दीपक हिरे : सकाळ वृत्तसेवा
वज्रेश्वरी, ता. ११ : कोसळणारे धबधबे... दवबिंदूंनी ओथंबलेली हिरवाई आणि हिरव्या गालीच्यावर डोकावणारी रंगीबेरंगी फुले... जणू हिरव्या गालीच्यावर उमटलेले फुलांचे नक्षीकाम! निसर्गाचे हे देणं पाहण्यासाठी सध्या भिवंडीच्या ग्रामीण भागातील माळरानांवर पर्यटकांची गर्दी होत आहे. तालुक्यातील उसगाव, अकलोली, वज्रेश्वरी, घोटगाव, दुगाड, मोहिली, म्हाळुंगे आदी माळराने प्रवासी आणि पर्यटकांना साध घालत असल्याने स्थानिकांना छोट्या-मोठ्या रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे.
काही दिवसांपासून धो-धो कोसळणाऱ्या पावसाचा जोर आता काहीसा थांबला आहे. त्यामुळे मुंबई-बडोदा महामार्गावरून जाताना पर्यटक भिवंडी तालुक्यात येताच माळरानांचा बहर त्यांचे लक्ष वेधून घेत आहे. निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची वाहने येथील घोटगाव, गणेशपुरी, दुगाड, म्हाळुंगे माळरानांवर थांबू लागली आहेत. तेरडा, ताग, सुवासिक सफेद मुसली, कर्णफुल, फोंडशी, रान हळद, सीतेची वेणी, रानभेंड, अंजनी, भारंगी, कुड्याची फुले, कर्टुल्याची फुले, रान दोडगा अशी स्थानिक भाषेत ओळखली जाणारी अनेक प्रकारची फुले पर्यटकांना आकर्षित करत आहेत. पावसाच्या सरींमुळे फुलांचा ताजेपणा वाटसरूंना अधिकच भुरळ घालत आहे.
भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागात अशी अनेक माळराने आहेत, जी पर्यटकांच्या नजरेतून आतापर्यंत दुर्लक्षित राहिली होती. धबधबे, धरणे यांच्यापेक्षा ही माळराने अधिक सुरक्षित आहेत. आता विविधरंगी रानफुले, गवतफुलेही पर्यटकांना खुणावत आहेत. गणेशपुरी, उसगाव परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे. पावसाळा सुरू होताच माळरानात, डोंगरावर विविध प्रकारच्या वनस्पती, फुलझाडे उगवतात. साधारणतः श्रावण महिन्यापर्यंत हा बहर टिकतो. सप्टेंबर-ऑक्टोबर हा महिना सण-उत्सवांचा असल्याने तेरडा, रानभेंडी, सोनकी, रानआलं, गेंद, मोतिया व कवली अग्निफुलांना विशेष महत्त्व आहे. येथील निसर्गप्रेमी पर्यटकांसाठी हा काळ पर्वणीसारखा ठरत आहे.
रानफुलांचा महोत्सव
फुलांची शास्त्रीय नावे वेगळी असली तरी त्यांना स्थानिक भाषेत विशेष नावाने ओळखले जाते. यात पानकुसुम (फॉरेस्ट स्पायडर लिली), खाजकांदे, सुवासिक सफेद मुसली, कर्णफुल, फोंडशी, रान हळद, सीतेची वेणी, अंजनी, भारंगी, कुड्याची फुले, कर्टुल्याची फुले, रान दोडगा, शेरवड अशी जवळपास ५० ते ६० प्रकारची फुले माळरानात बहरतात.
प्रसिद्धीची गरज
घोटगाव, बोकडकडा, उसगाव, अकलोली, केलठण अशी तालुक्यात अनेक माळराने आहेत, जी अद्याप अपरिचित आहेत. यास प्रसिद्धी मिळाल्यास किंवा महाराष्ट्र सरकारने विशेष लक्ष दिल्यास पर्यटनाचे एक नवे दालन सुरू होऊ शकेल, असे गणेशपुरीतील भिवाळी गावातील निसर्गप्रेमी
– वैभव पवार, निसर्गप्रेमी, भिवाळी, गणेशपुरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.