
अंबरनाथ, ता. १३ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्य रस्ते आणि शहराअंतर्गत येणाऱ्या रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधी आणि डासांच्या पैदासीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेचे सफाई कर्मचारी कचरा उचलण्यास नकार देत असल्याने परिसरात कचऱ्याचे ढीग होत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगत आहेत.
अंबरनाथ पूर्व परिसरात परांजपे चाळ, रिलायन्स रेसिडेन्सी, बारकूपाडा येथे जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परांजपे चाळीच्या समोरील रस्त्यावर अक्षरशः कचरा पसरला आहे. यातून नागरिकांची ये-जा सुरू असते. चाळीसमोर रस्त्यालगत हा कचरा अनेक दिवसांपासून पडून आहे. पावसामुळे हा कचरा भिजून कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. त्यावर आता डासांची पैदास होत आहे. त्यामुळे नागरिक नाकाला रुमाल बांधून जात आहेत. कुसुम कुंज बंगल्यापासून ते परांजपे चाळीच्या टोकापर्यंत हा कचरा रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना यातूनच जावे लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही पालिका हा कचरा उचलत नसल्याने येथील रहिवासी हतबल झाले आहेत.
अतिशय दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांमध्ये कचऱ्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. याच परिसरात अनेक नव्या सोसायटी उदयास आल्या आहेत. आम्ही झोपडपट्टीतला नाहीत सोसायट्यामधलाच कचरा उचलतो, अशी धक्कादायक माहिती पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी रहिवाशांना दिली. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त करत आम्ही माणसे नाहीत का, आम्हाला निरोगी आयुष्य जगण्याचा अधिकार नाही का, असा सवाल उपस्थित केला आहे.
अनेकदा पालिकेला संपर्क साधला, पत्रव्यवहारही केला. उद्या कचरा उचलतो, असे उत्तर देऊन चालढकल केली जाते. प्रत्यक्षात कचरा तसाच असल्याने दुर्गंधी आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे आजार आणि रुग्णालयाचा खर्च वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हा कचरा रोज उचलण्यात यावा.
- प्रकाश नलावडे, भालचंद्र भोईर प्रतिष्ठान
माझी मुलगी रक्ताच्या कर्करोगाने ग्रस्त आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. हा कचरा आणि सांडपाण्यामुळे रोगराई पसरत असून, घरातील लहान मूल, सून, मुलगा सर्व कुटुंबच आजारी पडले आहेत.
- कालिंदरी गुप्ता, महिला, स्थानिक रहिवासी
डास, दुर्गंधी, किडे यांचा घरात शिरकाव वाढला आहे. पालिकेची गाडी रोज सफाईला येते; मात्र शेजारच्या सोसायटीमधून कचरा उचलून घेऊन जाते. इथला कचरा उचलण्यास सफाई कर्मचारी नकार देतात.
- मंजू यादव, स्थानिक महिला
अंबरनाथ : येथील मुख्य रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग होत आहेत.