दुर्मिळ तिबोटी खंड्याचा वाचवला जीव

दुर्मिळ तिबोटी खंड्याचा वाचवला जीव

Published on

दुर्मिळ तिबोटी खंड्याचा वाचवला जीव

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : शहरातील पूर्वेकडील भागत पी. पी. चेंबर येथे दुर्मिळ तिबोटी खंड्या हा पक्षी शनिवारी (ता. १३) सकाळी आढळून आला. जागरूक नागरिकांनी दुर्मिळ पक्षी येथे असल्याची माहिती पॉज संस्थेला दिली. संस्थेच्या ऋषिकेश सुरसे आणि ओंकार साळुंखे यांनी त्याला जीवदान दिले. तिबोटी खंड्या हा पावसाच्या सुरुवातीला महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीत आढळणारा पक्षी आहे. भूतान, श्रीलंका या देशांतून दोन ते तीन महिन्यांसाठी हा पक्षी स्थलांतरित होऊन येथे येतो. पावसाच्या सुरुवातीला आलेले हे पक्षी ऑगस्टमध्ये परतीच्या प्रवासाला निघतात.

पाऊस सुरू झाला की तिबोटी खंड्याला प्रणयाची आस लागते. मादीला आकर्षित करण्यासाठी त्याची नृत्यवजा कोर्टशिप पाहण्याजोगी असते. तसेच मादीला रिझवण्यासाठी खाद्य भेट हे एक वैशिष्ट्य आहे. या भेटीत छोटे सरडे, कोळी, खेकडे, चोपई असे नानाविध प्रकार सामाविष्ट असतात. यानंतर मग मीलन होऊन नर-मादी दोघे पण घरटे बांधण्यास सुरुवात करतात. सगळेच किंगफिशर हे जमिनी खोदून त्यात घरटे करणारे आहेत. ओढ्याच्या काठाचा भाग, छोट्या मातीच्या भिंती आणि बांध अशा ठिकाणी बीळ खोदतात. ओढ्यावरती वाकलेल्या फांदीवरून झेप घेऊन वेगाने चोचीच्या सहाय्याने माती खोदून पुन्हा त्याच वेगाने आपल्या जागी येऊन बसताना यांना पाहणं एक पर्वणीच आहे असते.

पाल, सापसुरळी, छोटे खेकडे, कोळी, बेडूक असे त्याचे आवडते खाद्य. जिथे वाहते पाणी आणि भुसभुशीत जमीन असेल तिथे एक मीटर लांबीचे घरटे तयार करून त्यामध्ये एका विणीच्या मोसमात तीन-चार अंडी घालतात. पिल्लू अंड्यातून बाहेर आल्यानंतर २० दिवसांत घरट्याबाहेर येतात. तोपर्यंत त्यांची काळजी घेतली जाते. २०२०मध्ये तिबोटी खंड्याला रायगडचा जिल्हा पक्षी म्हणून घोषित करण्यात आले आहे.


पर्यावरणाचा संबंध
चक्रीवादळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे त्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण होऊ शकतो. हा परतीच्या प्रवासाला असलेला तिबोटी खंड्या शहरातील कावळ्यांच्या नजरेत पडला असेल आणि त्यांनी हल्ला केला असावा, असे पक्षिमित्र आणि पॉज संस्था यांचे मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com