निवडणूक खर्च सादर न करणे भोवले
दिवेआगर ग्रामपंचायतीचे सरपंचांसह नऊ सदस्य अपात्र
श्रीवर्धन, ता. ११ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेले सरपंच आणि काही सदस्यांना निवडणूक खर्च सादर न करणे महागात पडले आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी सरपंच, सदस्यांसह एकूण सहा जणांना पाच वर्षांसाठी अपात्र घोषित केले आहे. या आदेशामुळे दिवेआगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मंगळवारी (ता.९) याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले.
योगेश मदन परकर यांनी २२ ऑगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या अर्जात त्यांनी दिवेआगर ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत काही उमेदवारांनी निर्धारित वेळेत निवडणूक खर्चाचा हिशोब सादर केला नसल्याचे म्हटले आहे.
---------------------------------
ऑगस्टपासूनचा हिशोब
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, उमेदवारांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून ३० दिवसांच्या आत खर्चाची माहिती देणे बंधनकारक आहे. दिवेआगर ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा निकाल २० डिसेंबर २०२२ रोजी जाहीर झाला होता, त्यामुळे २० जानेवारी २०२३ पर्यंत हा खर्च सादर करणे आवश्यक होते. या प्रकरणी तहसीलदार, श्रीवर्धन यांनी अहवाल सादर केला. या अहवालानुसार, अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सहा ते सात महिन्यांनी (जुलै २०२३ मध्ये) खर्चाचा हिशोब सादर केला. मोहिता मंगेश कोसबे यांनी तर तब्बल दीड वर्षांनंतर हिशोब सादर केला असल्याचे अहवालात नमूद आहे.
----------------------------------------
स्वराज्य संस्थांसाठी संदेश
उमेदवारांनी दिलेल्या लेखी निवेदनात असे म्हटले आहे की, विजयाच्या धावपळीत कार्यकर्त्यांकडून कागदपत्रे गहाळ झाली. तसेच, मार्च २०२३ मधील होळी, एप्रिल २०२३ मधील हनुमान जन्मोत्सव आणि इतर पारंपरिक उत्सवांमुळे ग्रामपंचायतीचे कामकाज तातडीने सुरू करणे आवश्यक असल्याने खर्च सादर करण्यास उशीर झाल्याचे त्यांनी म्हटले. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी हे कारण पुरेसे नसल्याचे स्पष्ट केले. जिल्हाधिकारी किशन ना. जावळे यांनी अखेरीस अर्जदार योगेश मदन परकर यांचा अर्ज मंजूर करत, विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांना पुढील पाच वर्षांसाठी ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच म्हणून राहण्यास किंवा निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविण्याचा आदेश पारित केला आहे. यामुळे दिवेआगरच्या राजकारणात मोठी खळबळ माजली असून, हा निर्णय इतर स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीही एक महत्त्वाचा संदेश देणारा ठरला आहे.
-------------------------------
कागदपत्रे गहाळ झाल्याचे कारण
प्रत्येक उमेदवाराने “निवडणूक विजयाच्या धामधुमीत निवडणूक खर्चाच्या कागदपत्रांची गहाळी” किंवा इतर कारणे दाखवली होती; मात्र, प्रशासनाने ही कारणे पुरेशी न मानता त्यांना अपात्र ठरवले आहे. पुढील पाच वर्षांसाठी कोणतेही ग्रामपंचायत पद धारण करण्यास किंवा निवडणूक लढण्यास बंदी असणार आहे.
----------------------------------
अपात्र ठरलेले:
१. राकेश कृष्णा केळसकर
२. श्रुती संदीप कोसबे
३. अंजली अजित घडसी
४. तृप्ती सदानंद चोगले
५. अंकुर नरेश भगत
६. अल्केश अशोक पाते
७. मोहिता मंगेश कोसबे
८. सिध्देश जयंत कोसबे (सरपंच)
९. आरोही ओमकार तोंडलेकर