‘कुणबी समाज’ सोमवारी तहसीलवर धडकणार
‘कुणबी समाज’ सोमवारी तहसीलवर धडकणार
मराठा आरक्षणाविरोधात देणार निवेदन; जिल्ह्यातील सर्व कार्यालयांवर मोर्चा
सकाळ वृत्तसेवा
अलिबाग, ता. १३ : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतला आहे. या निर्णयाला कुणबी समाजासह इतर ओबीसी (इतर मागासवर्गीय) समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. मराठा आरक्षणाविरोधात कोकणातील कुणबी समाजाकडून आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. यातील पहिला भाग म्हणून शासनाला सोमवारी (ता. १५) निवेदन दिले जाणार आहे.
रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर कुणबी समाज आक्रमकपणे आंदोलन करणार असल्याचे समाजाच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ येथे बुधवारी (ता. १०) कोकणातील सातही जिल्ह्यांतील सर्व शाखा पदाधिकाऱ्यांची सभा घेण्यात आली. या सभेत मराठा आरक्षणाविरोधातील आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या आंदोलनाची सुरुवात म्हणून सरकारकडे कुणबी समाजाचे लेखी म्हणणे मांडण्यात येणार आहे. सोमवारी (ता. १५) प्रत्येक तहसील कार्यालयावर आंदोलन करण्याचे कुणबी समाजातील नागरिकांनी आवाहन करण्यात आले आहे. यासाठी कुणबी समाजोन्नती संघाशी सलग्न असलेल्या संस्थांचे पदाधिकारी यात सहभाग घेणार आहेत. या वेळी देण्यात येणाऱ्या निवेदनातूनही शासनाने मराठा आरक्षणाविरोधात काही प्रतिसाद न दिल्यास पुढील महिन्यात ७ ओक्टोबर रोजी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन केले जाणार असल्याची माहिती कुणबी समाजोन्नती संघाचे सरचिटणीस कृष्णा वणे यांनी दिली आहे.
-------------------------------
ओबीसी नेत्यांचा आरोप
सरकारने मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जो सरकारी निर्णय काढला आहे, तो बेकायदा आणि संवैधानिक नियमांच्या विरोधात आहे, असा आरोप ओबीसी समाजातील नेत्यांनी केला आहे. या जीआरमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.