कल्याण पूर्वेत भाजपा महिला मोर्चाचे निषेध आंदोलन
कल्याण पूर्वेत भाजपा महिला मोर्चाचे कॉंग्रेसविरोधात निषेध आंदोलन
कल्याण, ता. १३ (बातमीदार) : बिहार काँग्रेसने आपल्या समाज माध्यम अकाउंटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आई स्व.हीराबेन मोदींची एआय तंत्रज्ञान वापरून तयार केलेली व्हिडिओ पोस्ट केली आहे. या व्हिडिओमध्ये मोदींच्या आईंना त्यांच्या राजकारणावर टीका करताना दाखवले आहे. या व्हिडिओवरून देशभरात मोठा राजकीय वाद उफाळला असून, कल्याण पूर्वेत भाजप महिला मोर्चाने निषेध आंदोलन केले आहे.
या आंदोलनात कल्याण पूर्वच्या आमदार सुलभा गायकवाड यांच्यासोबत भाजप प्रदेश सचिव प्रिया शर्मा, मनीषा केळकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा रेखा चौधरी यांच्यासह असंख्य महिला पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. काँग्रेसचा हा प्रकार असंवेदनशील आणि मातृत्वाचा अवमान करणारा आहे. याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो. मातृशक्तीचा अपमान सहन केला जाणार नाही, असा इशारा यावेळी भाजपाच्या वतीने कल्याण पूर्वेत देण्यात आला. दरम्यान, दिल्ली पोलिसांकडे भाजपच्या कार्यकर्त्याने तक्रार दाखल केली असून, सध्या प्राथमिक चौकशी सुरू आहे.