बीएसयुपी योजनेतील २९५ घरे तयार

बीएसयुपी योजनेतील २९५ घरे तयार

Published on

बीएसयुपी योजनेतील २९५ घरे तयार
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार वितरण
भाईंदर, ता. १३ (बातमीदार) : काशीमिरा भागातील झोपडपट्टीधारकांसाठी सुरु असलेल्या बीएसयुपी योजनेतील आणखी २९५ घरे तयार झाली आहेत. लाभार्थ्यांना या घरांचे वाटप लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. एकंदर २३०० लाभार्थ्यांसाठी ही योजना सुरु असून याआधी ४७४ लाभार्थ्यांना घरांचे वाटप झालेले आहे.
काशीमिरा येथील जनता नगर व काशी चर्च या दोन झोपडपट्ट्यांमधील सुमारे साडेचार हजार झोपडपट्टीधारकांसाठी ही योजना राबवली जात आहे. पहिल्या टप्प्यात २३०० लाभार्थ्यांसाठी घरांचे बांधकाम सुरु आहे. महापालिकेकडे निधीच नसल्याने कासवाच्या गतीने ही योजना सुरु आहे. महापालिकेने बीएसयुपी योजना २०११ मध्ये सुरु केली होती. केंद्र व राज्य सरकारकडून याला निधी मिळणार होता. मात्र योजनेत अनेक अडथळे निर्माण झाल्याने ती रखडली. योजना वेळेत पूर्ण न केल्याने केंद्र सरकारने व त्यापाठोपाठ राज्य सरकारनेही निधी बंद केला. त्यामुळे योजना पूर्ण करण्यासाठी महापालिकेने एमएमआरडीएकडे १४० कोटी रुपयांचे कर्ज मागितले. मात्र, त्यापैकी केवळ २० कोटींचेच कर्ज महापालिकेला मिळाले. त्यातून काही इमारतींची बांधकामे झाली. मात्र, आता एमएमारडीएकडून उर्वरित कर्जही मिळत नसल्याने इमारतींचे बांधकाम महापालिकेच्या स्वत:च्या निधीतून सुरु आहे.
आतापर्यंत ७६९ लाभार्थ्यांना घरे मिळाली आहेत. तर आणखी सहाशे घरे आगामी सहा महिन्यात तयार होणे अपेक्षित आहे. उर्वरित सर्व लाभार्थी संक्रमण शिबिरात रहात असून पक्की घरे मिळण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने मागणी करत आहेत. परंतु, सर्व लाभार्थ्यांना घरे बांधून देणे हे महापालिकेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

पीपीपी तत्वावर घरे बांधणार
साडेचार हजार लाभार्थ्यांपैकी २३०० लाभार्थ्यांसाठी योजना सुरु आहे. मात्र, उर्वरित २२०० लाभार्थ्यांसाठी योजनाच सुरु झालेली नाही. घरांच्या बांधकामासाठीच महापालिकेकडे पैसाच नसल्याने शिल्लक २२०० लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी महापालिकेने सरकारकडे पदर पसरला आहे. शिल्लक योजना पीपीपी तत्वावर पूर्ण करण्याचा महापालिकेचा विचार आहे.

प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे
काही दिवसांपूर्वीच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी एका बैठकीचे आयोजन केले होते. त्यात बीएसयुपी योजनेसाठी महापलिकेच्या पीपीपी प्रस्तावाला तातडीने मंजूरी देऊन नगरविकास विभागाकडे पाठविण्यात यावा, अशा सूचना सरनाईकांनी महसुल विभागाला केल्या. त्यानंतर हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर मान्यतेसाठी जाणार आहे. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव नगरविकास विभागाकडे पाठवला आहे.

बीएसयुपी योजनेतील २९५ घरे तयार आहेत व लाभार्थ्यांना त्यांचा ताबा लवकरच देण्यात येणार आहे. आगामी सहा महिन्यांच्या कालावधीत आणखी सहाशे घरे तयार होणार आहेत
- दीपक खांबित, शहर अभियंता, मिरा भाईंदर महानगरपालिका

सोबत बीएसयुपी योजनेतील इमारतीचे संग्रहित छायाचित्र

Marathi News Esakal
www.esakal.com