दि. बां.च्या अभिवादनासाठी आज कार रॅली
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी भिवंडी ते नवी मुंबई जासई गावापर्यंत अभिवादन कार रॅली काढण्यात येणार आहे. मानकोली येथून रविवारी सकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या रॅलीत दोन हजारांहून अधिक कार सहभागी होणार असल्याची माहिती खासदार सुरेश म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली भिवंडीहून नवी मुंबईत दाखल होऊन जासई गावात दि. बा. पाटील यांना अभिवादन करणार आहे. रॅलीसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली असून आता पुढील लढाई ही न्यायासाठीची असणार आहे, असे खासदार म्हात्रे यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. केंद्र सरकारने आमचा अंत पाहू नये, असा इशारा त्यांनी दिला.
असा असेल कार रॅलीचा मार्ग
मानकोली-मोठागाव रोड येथून रॅली निघणार आहे. पुढे खारेगाव, कळवा, विटावा, दिघा, ऐरोली नाका, रबाळे, घणसोली, कोपरी गाव, पामबीच मार्ग, सानपाडा, नेरूळ, करावे, नवी मुंबई पालिका मुख्यालय सर्कल, डावीकडून उरणमार्गे रेतीबंदर, विमानतळ रेतीबंदर गेट ते चिंचपाडा, पारगाव ओवाळे, जासई असा हा कार रॅली मार्ग आहे. जासई येथे दि. बा. पाटील यांची अभिवादन सभा होणार आहे.