देहव्यापार वस्तीतील मुलांना आशेचा किरण
भिवंडी, ता. १३ (वार्ताहर) : देहव्यापार वस्तीतील महिला या समाजाच्या अन्याय व अत्याचाराच्या बळी आहेत. प्रेमातील भुलथापांना, नोकरीचे प्रलोभन किंवा चंदेरी दुनियेच्या स्वप्नांना फसून त्या या वस्तीत येतात आणि नंतर त्यांच्या देहाचे शोषण सुरू होते.
भिवंडी ही यंत्रमागांची नगरी असल्याने येथे विविध प्रांतांतील कामगार वास्तव्यास आहेत. त्यामुळेच हनुमान टेकडी परिसरात देहव्यापार करणाऱ्या महिलांची वस्ती आकाराला आली. सुरुवातीला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील महिलांचा वावर असलेल्या या वस्तीत कालांतराने पूर्वांचल राज्यांबरोबरच नेपाळ व बांगलादेशी महिलांची संख्याही वाढली. डोंगरावरच्या दाट वस्तीतल्या अंधाऱ्या खोल्यांमध्ये शेकडो महिला राहतात. त्यांची मुलेही याच वातावरणात वाढत असल्याने त्यांच्यात अश्लील भाषा, हाणामारी व गुन्हेगारीकडे झुकाव निर्माण होत असे. मात्र, आज या वस्तीतील चिमुरड्यांचे चित्र बदलले आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वास दिसत आहे. यामागे ‘श्री सेवा संस्था’ संचलित ‘आशियाना’ हे संस्कार केंद्र आहे. संस्थेच्या प्रमुख डॉ. स्वाती सिंह यांनी २०१६ मध्ये देहव्यापार वस्तीतील महिला व मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महिलांना बोलते करणे व त्यांना एकत्र आणणे ही मोठी कसरत होती. परंतु त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महिलांनी हळूहळू आपली कथा उघड केली.
कोरोनाकाळात स्वाती सिंह यांनी सेवाभावाने केलेल्या मदतीमुळे या महिलांचा विश्वास संपादन झाला. यानंतर, महिला व बालकल्याण विभागाचे तत्कालीन अधिकारी महेंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली व भिवंडी महापालिकेच्या सहकार्याने ‘आशियाना’ संगोपन केंद्र सुरू करण्यात आले. सुरुवातीला भाड्याच्या जागेत सुरू झालेले हे केंद्र नंतर आयुक्त अनमोल सागर यांच्या मदतीने फेणेपाडा येथे स्थिरावले. आज येथे ३५ ते ४० विद्यार्थी आनंदाने शिक्षण घेत आहेत. विशेष म्हणजे, चाईल्ड वेल्फेअर कमिटीच्या सहकार्याने या मुलांना शासकीय वसतिगृहात शिक्षणाची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे ते नव्या जीवनप्रवाहात प्रवेश करत आहेत.
भविष्याकडे वाटचाल
बदनाम वस्तीतील मुलांच्या आयुष्यात ‘आशियाना’ने आशेचा किरण आणला आहे. ते नव्या भविष्याकडे वाटचाल करत आहेत, असे डॉ. स्वाती सिंह म्हणाल्या.