वाशीत वायू प्रदूषण
वाशीत वायू प्रदूषण
श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे आदी प्रकार सुरू
तुर्भे, ता. १३ (बातमीदार) : पावसामुळे वातावरण काही प्रमाणात स्वच्छ झाले होते. मात्र, पावसाची उघडीप होताच वाशी परिसर पुन्हा एकदा वायू प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे. वाशी सेक्टर २६, २८ व २९ परिसरात बुधवारी पहाटेपासूनच धुरकट वातावरण व दुर्गंधीयुक्त वास पसरण्यास सुरूवात झाली आहे. एमआयडीसीमधील रासायनिक कारखान्यांतून पुन्हा वायू प्रदूषण सुरू झाले असून त्याचा फटका थेट नागरिकांना बसत आहे.
या रासायनिक वायूमुळे श्वास घेण्यास त्रास होणे, घसा खवखवणे, डोळ्यांत जळजळ, तसेच सर्दीसारखे लक्षणे आढळून येत आहेत. हवेची दृश्यमानता कमी झाल्याने धुक्यासारखा दाट धूर पसरल्याची भावना निर्माण झाली आहे. रात्रीच्या वेळी वायू प्रदूषण अधिक वाढत असल्याने नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाशी व घणसोलीलगतचा संपूर्ण पट्टा महापे औद्योगिक क्षेत्राशी जोडलेला आहे. त्यामुळे औद्योगिक प्रदूषणाचा फटका या भागातील नागरिकांना नेहमीच सहन करावा लागतो. कोपरी गाव, वाशी सेक्टर २६ व २८ परिसरातील नागरिकांनी यापूर्वीही प्रदूषणाविरोधात तक्रारी नोंदवल्या होत्या. महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, नवी मुंबई महापालिका व मुख्यमंत्र्यांकडे देखील वारंवार निवेदने देऊन लक्ष वेधले गेले. काही काळ प्रदूषणात उसंत मिळाली होती; मात्र आता कारखान्यांनी पुन्हा प्रदूषण सुरू केले असल्याचे सांगण्यात आले.
................
आंदोलनाची चेतावणी
स्थानिक नागरिक संघटना आणि राजकीय पक्ष आता आंदोलनाच्या तयारीत आहेत. या संदर्भात शिवसेना (उबाठा) नवी मुंबईचे उपजिल्हाप्रमुख संकेत डोके यांनी स्पष्ट इशारा दिला आहे. कोपरी गाव व वाशी सेक्टर २६ परिसरात होणाऱ्या वायू प्रदूषणाविरोधात वारंवार तक्रारी करूनही कारवाई झाली नाही. जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्हाला महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या विरोधात थेट आंदोलन करावे लागेल, असे ते म्हणाले.
...........
नागरिकांचा सवाल
औद्योगिक विकास आणि रोजगार महत्त्वाचे असले तरी त्यासाठी सामान्य जनतेच्या आरोग्याशी तडजोड केली जाऊ शकत नाही, असे स्थानिकांचे मत आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, कारखान्यांनी पर्यावरणीय नियमांचे पालन करावे, प्रदूषण नियंत्रण यंत्रणा कार्यरत ठेवावी आणि प्रशासनाने या प्रकरणात ठोस कारवाई करावी.