प्रभागरचनेविरोधात शुन्य हरकती

प्रभागरचनेविरोधात शुन्य हरकती

Published on

प्रभागरचनेविरोधात शून्य हरकती
नगरपालिकेकडून प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे
उरण, ता. १३ (वार्ताहर)ः उरण नगर परिषदेच्या प्रभाग संख्या वाढल्याने सदस्य संख्या वाढली आहे. प्रारूप आराखड्यानंतर उरण नगर परिषदेमध्ये एकही हरकत राजकीय पक्षांकडून किंवा नागरिकांकडून आली नसल्याने अंतिम रचनेचा प्रस्ताव नगरपालिकेने शासनाकडे पाठवला आहे.
उरण नगरपालिकेची मुदत संपून तीन वर्षांपासून कारभार प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे. १७ हजारांहून अधिक मतदारांची संख्या असलेल्या उरण नगर परिषदमध्ये नऊ प्रभागांतून १८ सदस्य व नगराध्यक्षपदासाठी निवड झाली होती. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उरण नगरपालिकेच्या प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे नवीन प्रभागरचनेनंतर प्रभागाची संख्या १० झाली असून नगराध्यक्ष वगळून सदस्य संख्या २१ वर गेली आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर हरकती व तक्रारी दाखल करण्याची सूचना केली होती. तशा प्रकारचे फलकही लावण्यात आले; मात्र निर्धारित मुदतीत राजकीय पक्ष, मतदार तसेच नागरिकांकडून हरकत नोंदवली गेली नसल्याची माहिती उरण नगरपालिकेने दिले आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील प्रभागरचनेविरोधात शून्य हरकती असलेले उरण नगर परिषद एकमेव ठरली आहे.
----------------------------------
प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा तयार केल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाने, नागरिकांकडून हरकत आलेली नाही. उरण नगरपालिकेचा अंतिम प्रभागरचनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे.
- समीर जाधव, मुख्याधिकारी, उरण नगरपालिका

Marathi News Esakal
www.esakal.com