रानशेत महालक्ष्मी गड मार्ग स्थानिकांच्या श्रमदानातून खुला
रानशेत महालक्ष्मी गड मार्ग स्थानिकांच्या श्रमदानातून खुला
कासा, ता. १३ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील धार्मिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा असलेला रानशेत महालक्ष्मी गड काही दिवसांपूर्वी मुसळधार पावसामुळे दरड कोसळल्याने अडचणीत आला होता. गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर माती व दगड घसरल्याने मुख्य रस्ता अरुंद झाला होता. यामुळे गडावर जाणाऱ्या भाविकांना धोका निर्माण झाला होता.
या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्याने भाविक व स्थानिक त्रस्त झाले होते. अशा वेळी गडावरील पुजारी, दुकानदार व स्थानिक युवकांनी श्रमदानाचा मार्ग निवडला. त्यांनी खडी, रेती व सिमेंटची व्यवस्था करून स्वतःच्या प्रयत्नातून रस्ता काँक्रीट करून सुरक्षित बनविला. काही दिवसांच्या अथक परिश्रमानंतर अखेर मार्ग पुन्हा भाविकांसाठी खुला करण्यात आला.
या उपक्रमामुळे गडावर येणाऱ्या भाविकांमध्ये दिलासा व समाधानाचे वातावरण आहे. कोणत्याही शासकीय मदतीशिवाय गावकऱ्यांनी केलेल्या श्रमदानातून हा मार्ग खुला केल्याने सामाजिक एकतेचे व कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण उभे राहिले आहे. भाविक व गावकऱ्यांनी या कार्यकर्त्यांचे कौतुक करीत प्रशासनाने अशा प्रसंगी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणीही केली आहे.